सुगी आली; पण अर्धीच ओंजळ भरली!
By Admin | Updated: March 11, 2016 23:18 IST2016-03-11T22:46:09+5:302016-03-11T23:18:31+5:30
वाई तालुक्यातील चित्र : ज्वारी काढणी-भरडणीच्या कामास वेग; कडब्यात घट झाल्याने चाऱ्याचे दर वाढले

सुगी आली; पण अर्धीच ओंजळ भरली!
वाई : वाई तालुक्यातील शेतकरी ज्वारीच्या काढणी व भरडणीच्या कामात व्यस्त असून मध्यंतरीच्या काळातील अवकाळी पाऊस काही गावांच्या ग्रामदैवताच्या वार्षिक यात्रा यामुळे काढणीस उशीर झाला होता. या वर्षी ज्वारीच्या उत्पादनात व जनावरांच्या चाऱ्यासाठी लागणाऱ्या कडब्यात घट झाली असून, त्याचे दर वाढल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे.
यावर्षी वाई तालुक्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी झाले. गेल्या वर्षी पेरणीनंतर पावसाने उघडीप दिल्याने काही ठिकाणी पिके जळून गेली होती. यावर्षी पाऊस कमी पडल्याने धोमधरणात फक्त चाळीस टक्के पाणीसाठा झाला होता. मधल्या काळात पाऊस झाल्याने रब्बीच्या हंगामातील पिकांच्या पेरण्या झाल्या होत्या.
परंतु गहू, ज्वारी या पिकांना पुरेसे पाणी न मिळाल्यामुळे त्यांच्या उत्पादनात व जनावरांना लागणाऱ्या चाऱ्यात मोठी घट झाली आहे. ज्वारी व गहू काढणीच्या वेळी अवकाळी पाऊस आल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेली पिके व चारा खराब होण्याची भीती निर्माण झाली होती.
तालुक्यातील काही गावांच्या वार्षिक ग्रामदैवताच्या यात्राही चालू झाल्या होत्या. त्यामुळे ज्वारी व गहू काढणीस उशीर होता. यावेळी पाऊस न पडल्यामुळे उत्पादनात घट झाल्याने ज्वारीचे व जनावरांच्या चाऱ्याचे दर खूपच वाढल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे.
तालुका आणि परिसरात जावून अनेक शेतकऱ्यांनी जनावरांच्या खाद्याची सोय केली आहे. ज्वारी, गहू काढणी व मळणीच्या शिवारात सर्वत्र कामे चालू असून, शेतकरी कामात व्यस्त आहेत. (प्रतिनिधी)
या वर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने विहिरींच्या पाण्याच्या पातळीत खूपच घट झाली होती. त्यामुळे ज्वारी, गहू या पिकांना पुरेसे पाणी देता आले नाही. त्यामुळे ज्वारीच्या व चाऱ्याच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. व दरही वाढणार आहेत.
-गणपत वरे, शेतकरी कुसगाव