कठडे रंगविले; रस्त्यांचं काय?
By Admin | Updated: December 26, 2014 00:21 IST2014-12-25T21:22:45+5:302014-12-26T00:21:35+5:30
यात्रेचा मार्ग बिकट : वाई-मांढरदेव रस्त्याची दुरवस्था

कठडे रंगविले; रस्त्यांचं काय?
मांढरदेव : मांढरदेव, ता. वाई येथील मांढरदेवहून वाईकडे जाणाऱ्या रस्त्याची मांढरदेव ते कोचळेवाडी दरम्यान मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे भाविकांना व नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
मांढरदेव येथील श्री काळूबाईची यात्रा अवघ्या दहा दिवसांवर येवून ठेपली आहे. त्यामुळे मांढरदेवला येणाऱ्या भाविकांची संख्येत वाढ होऊ लागली आहे. यात्रेच्या संपूर्ण महिनाभर भाविक मांढरदेव येथे येत असतात. मांढरदेवला येणारे भाविक वाई व भोर मार्गे मांढरदेवला येतात. हे दोन्ही मार्ग कोचळेवाडी येथे एकत्र येतात. व तेथून चार किलोमीटर अंतरावर ही वाहने प्रवास करतात. त्यामुळे हा रस्ता सतत वर्दळीचा असतो.
वाहनांची संख्या जास्त असल्याने हा रस्ता उत्तम असणे गरजेचे आहे. मात्र, या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यात जागोजागी मोठ-मोठे खड्डे पडून
खडी रस्त्यावर आली आहे. त्यामुळे भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे.
संबंधित विभागाने मांढरदेव ते कोचळेवाडी दरम्यानच्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण लवकरात लवकर करावे, अशी मागणी नागरिक, वाहनधारक व भाविकांमधून होत
आहे. (वार्ताहर)
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहनधारकांमध्ये नाराजी
दरवर्षी यात्राजवळ येताच संबंधित विभागाकडून रस्त्याची डागडुजी होते. मात्र, चालूवर्षी यात्राजवळ येऊनही संबंधित विभाग सुस्त आहे. रस्त्याचे कठडे रंगविले आहेत. मात्र, वाहतुकीचा मुख्य रस्ताच खराब अवस्थेत आहे. त्यामुळे वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.