शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

आनंदाची दिवाळी

By admin | Updated: October 28, 2016 17:13 IST

दिवाळी हा शांत, सुंदर प्रकाशाचा सण आहे. भपक्याचा नाही. दिवाळी जर नावीन्याने आणि काळाचे भान ठेवून मजेत साजरी केली तर...

- सचिन कुंडलकर

दिवाळी हा शांत,सुंदर प्रकाशाचा सण आहे. भपक्याचा नाही. दिवाळी जर नावीन्याने आणि काळाचे भान ठेवून मजेत साजरी केली तर खूप मजा येते. वर्षभर राबून आपण हा वेळ हक्काच्या आनंदासाठी जपून ठेवलेला असतो. आपण त्याची वाट पाहत असतो. दिवाळीच्या सुटीचा आनंद एकमेकांना भेटून भरपूर गप्पा मारण्यात आहे. तोच सण आहे. बाकी सगळा दिखावा...फटाके वाजवावेसे वाटत नाहीत, वर्षभर नवे कपडे घेणे चालूच असते त्यामुळे नव्या कपड्यांचे कौतुक उरत नाही. त्याचप्रमाणे हल्ली फराळाच्या गोष्टी सगळीकडे वर्षभर मिळतात, त्याचे अप्रूप राहत नाही. दिवाळीला पडायला हवी तशी पुरेशी थंडी आता पडत नाही. त्यामुळे गेली काही वर्षे मी दिवाळीत उसना आनंद आणणे थांबवले. दिवाळी हा प्रामुख्याने लहान मुलांचा सण उरला आहे. ज्यांना ह्या काळात सुटी असते आणि खायची प्यायची चंगळ असते. किल्ला बनवता येतो. नवे कपडे मिळतात. मला ही शंकाच आहे की लहान मुलांना त्यांच्या आईवडिलांच्या आग्रहाने आणि त्यांनी लहानपणी किल्ला बनवलेला असल्याने हे सगळे करावे लागत असणार. नाहीतर मुले आनंदाने घरात रिकामी लोळत मोबाइल फोन्सवर गेम्स खेळण्यात जास्त आनंदी असतील. त्यांच्याशी कुणीतरी खरे बोलायला हवे की नक्की त्यांना काय हवे असते? मुलांची खरी उत्तरे ऐकली तर आईवडिलांना हार्ट अटॅक येतील इतकी हल्लीची मुले मोकळी आणि प्रॅक्टिकल आहेत. आपली हौस आणि आपल्या लहानपणाच्या सणावारांच्या आठवणीचे ओझे आपण त्यांच्यावर टाकले तर ती आपल्याला खासगीत हसत आपली चेष्टा करत असतात हे बऱ्याच तरुण पालकांना समजत नाही. पण असे बोलून चालत नाही. कारण हल्ली वातावरण असे आहे की सगळे एकमेकांच्या धाकाने सण साजरे करतात. लहान शहरांमध्ये माणसांना शेजारचे आणि नातेवाईक आपल्याला काय म्हणतील ह्याचा सतत संकोच असतो. त्यामुळे घरातले फराळ आणि वारेमाप खर्च हे त्या भीतीने केले जातात. माझ्या वयाच्या एकाही मैत्रिणीला आणि मित्राला घरी फराळ बनवत बसणे ह्या गोष्टीचा उत्साह उरलेला नाही. पण सांगणार कुणाला? कारण तुम्ही प्रथा बदललीत की घरापासून दारापर्यंत अनेकांच्या भावना दुखावल्या जातात. आणि त्याला आपण सगळे फार घाबरतो. शिवाय वारेमाप जाहिरातबाजी करून आपल्याला खर्च करण्याची सक्ती केली जाते. पाश्चिमात्य देशांमध्ये नाताळ सणाला लोकांना भरपूर खरेदी करायला भाग पाडावे म्हणून एकमेकांना भेट देण्याची संस्कृती बाजारव्यवस्थेने काळजीपूर्वक रुजवली. त्याला धर्माचा सुंदर मुलामा दिला. आपल्याकडे तीच प्रथा सर्व मार्केटिंग कंपन्या दिवाळीत तंतोतंत कॉपी करून वापरू लागल्या आणि काही कारण नसताना दिवाळीत एकमेकांना भेटी देण्याचा ब्रभा केला जाऊ लागला. सगळ्यांनी सगळ्यांना भेटवस्तू द्यायला हव्यात नाहीतर तुमची दिवाळी पूर्ण होऊ शकत नाही असे वातावरण जाहिरातींमधून पसरवणे सुरू झाले आणि साधा भारतीय मध्यमवर्ग ह्या नव्या परंपरेला लगेच भुलला. दिवाळी अशी कधीच नसायची. दिवाळी ही शांतता आणि स्वच्छता साजरा करण्याचा सण आहे. शांत सुंदर प्रकाशाचा सण आहे. भपक्याचा सण नाही. दिवाळीच्या मूळ आनंदापासून आज आपण एका खरेदी-विक्रीच्या, गोंगाटाच्या आणि दिखावेबाजीच्या संस्कृतीपर्यंत कधी येऊन पोचलो ते आपल्याला कळलेसुद्धा नाही. पूर्वी मी जे दिवाळी अंक वाचायचो त्यातला एकही मला आता वाचवत नाही. कारण भडक जाहिराती हे नुसते कारण नाही. कुणाकडे नव्याने म्हणण्यासारखे फार काही उरलेले नसते हे त्यामागचे प्रमुख कारण आहे. सर्व अंक हे जुन्या लोकांच्या जुनाट आठवणींनी भरलेले असतात. तेच तेच लेखक त्याच अंकात वर्षानुवर्षे लिहित असतात. आणि फेसबुकवर त्याच जुन्या कडब्याची मराठी माणसे दिवाळीत चर्चा करत बसलेली असतात. दिवाळीतील पाडवा पहाट नावाच्या कार्यक्रमांची तीच तऱ्हा आहे. तेच ते जुने दळण. तेच ते गायक. तेच विनोद. सण साजरे करण्याचे नवे पर्याय आपण शोधून न काढल्याने आपण त्याच गोष्टी दरवर्षी करत बसतो. माझी एक मैत्रीण मला परवा म्हणाली, मला दिवाळीत फराळाचं वगैरे करायचा इतका कंटाळा आला आहे अरे. नको वाटते आहे. कामाला चार दिवस सुटी आहे तर बाहेर शांत कुठेतरी घर बंद करून मुलांना घेऊन जावे वाटते आहे. पण तसे केले तर बरे दिसत नाही न. म्हणून शास्त्रापुरता थोडा फराळ बनवते आणि मुलांना वाईट वाटू नये म्हणून थोडे फटाके आणते. हे ती बोलत असताना तिची मुलगी म्हणाली, आई प्लीज फटाके वगैरे आणू नकोस आणि मला चिखलात जाऊन किल्ला वगैरे करायला भाग पाडू नकोस. मला एकदम हसायला आले आणि माझ्या मैत्रिणीचा चेहरा पडला. काळ बदलला आहे हे आपल्याला कळत असते, ऋतुचक्र बदलले आहे हे आपल्याला माहीत असते.. फक्त आपल्याला ते मान्य करण्याची भीती वाटत असते. दुसरे कुणीतरी थोडे वेगळे वागू लागले की मग आपण तसे वागू हा शहरी भित्रट मध्यमवर्गीय विचार त्यामागे असतो. सुरुवात आपल्यापासून नको. एकदा आपल्याला मुलेबाळे झाली की आपण जास्त संकोचलेले आणि घाबरट बनत जातो. आपल्यावर आपल्या आईवडिलांनी जे संस्कार केले तसेच आपल्याला कॉपी टू कॉपी आपल्या मुलांवर करायचे असतात. उगाच मुलांना संस्कृतीची माहिती नसली तर त्याचे बालंट आपल्यावर यायचे. पण सध्या मुले विशेषत: शहरातली मुले अतिशय हुशार निघाली आहेत. ती त्यांच्या आईवडिलांइतकी भाबडी आणि संकोचलेली उरलेली नसतात. त्यामुळे सर्व सोसायट्यांमध्ये सकाळचे दोन तास सोडले की पारंपरिक दिवाळीचे वातावरण संपते आणि घरातले सगळे भरपेट चापून टीव्हीसमोर आडवे होतात. दिवाळी ही इतर रविवारच्या सुट्यांप्रमाणे संपूनही जाते. अनेकदा ती संपून गेल्याने आपल्याला हायसेसुद्धा वाटते. कारण खिशाला भोक पडल्यासारखा वारेमाप खर्च चालू असतो. तो खर्च करायचा की नाही ह्याविषयी घरात कुणीच कुणाशी बोलत नाही. दरवर्षी हवे नको ह्याचा अजिबात विचार न करता अनेक कुटुंबात दिवाळीचा म्हणून एक ठरावीक आणि तोच तो खर्च करत बसतात. मला दिवाळीला घरापासून लांब राहवत नाही. दिवाळीचा हल्ली होणारा सर्वात मोठा आनंद हा की त्यावेळी सर्व भावंडांना आणि मित्रांना निवांत बसून गप्पा मारायला खूप वेळ असतो. सगळ्यांचा मिळून रिकामा वेळ असणे ही हल्लीच्या काळात इतकी मोठी चैन झाली आहे की मला सणाचा म्हणून जो आनंद होतो तो त्या रिकामटेकडेपणानेच होतो. एरवी वर्षभर कुणाला कुणाकडे जायला आणि गेलोच तर घड्याळ ठार मारून गप्पा मारत बसायला कुठे वेळ उरला आहे? दिवाळीच्या काळात हे जमून येते. मग अशावेळी उगाच घरातल्या बायका स्वयंपाकपाण्यात वेळ न घालवता मजेत सुटी घेतात. आम्ही सरळ बाहेरून जेवण मागवतो आणि एकमेकांना वेळ देतो. जेवणखाण ह्याचा फारसा बाऊ आम्ही करत बसत नाही. शिवाय आता सगळ्या मित्रांची आणि भावंडांची मुले पुरेशी मोठी झाली असल्याने (म्हणजे १० वर्षांची. ह्या वयात त्यांना स्वतंत्र विचार असतात) ती आपापल्या विश्वात गर्क असतात. अनेक ओळखीचे लोक दिवाळीत अनोळखी जागी प्रवास करतात. शहरातली कुटुंबे त्याच त्या ओळखीच्या रुटीनपासून आणि माणसांपासून जरा लांबवर जातात. दिवाळी जर नावीन्याने आणि काळाचे भान ठेवून मजेत साजरी केली तर खूप मजा येते. किती सुंदर दिसणारा सण आहे हा? मला जिथे तिथे ह्या चार दिवसात केलेली दिव्यांची सजावट पाहायला फार आवडते. कितीही ताण मनावर असले तरी रात्री उशिरा आणि पहाटे जर ह्या काळात बाहेर पडले तर शहराचे सुंदर रूप पाहून आपल्याला बरे वाटते. जागोजागी रोषणाई केलेली असते, पणत्या लावलेल्या असतात आणि वातावरणात एक प्रसन्नता असते. ती आपण सगळ्यांनी मिळूनच तयार केलेली असते. वर्षभर राबून आपण हा एकवेळ हक्काच्या आनंदासाठी जपून ठेवलेला असतो. आपण त्याची वाट पाहत असतो. मग प्रश्न हा उरतो की, इतक्या चांगल्या शांत रिकाम्या मौल्यवान काळातही आपण आपल्यामागे अनेक घरगुती कामे कशाला लावून घेतो? नवे मोठे खर्च का ओढवून घेतो? सुटीचा आनंद हा काही न करता एकमेकांना भेटून भरपूर गप्पा मारण्यात आहे. तोच सण आहे. बाकी सगळा दिखावा आहे.