खुशी लेके आया चॉँद ईद का!
By Admin | Updated: July 18, 2015 00:18 IST2015-07-17T22:07:29+5:302015-07-18T00:18:02+5:30
खरेदीसाठी गर्दी : रमजान ईदच्या पूर्वसंध्येला सुका मेवा, कपड्यांच्या बाजारात मोठी उलाढाल

खुशी लेके आया चॉँद ईद का!
जावेद खान - सातारा -रमजान महिन्यात महिनाभर उपवास ठेवल्यानंतर या उपवासाची सांगता रमजान ईदने होते. गेल्या एक आठवड्यापासून बाजारपेठेत ईदच्या खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली असून, ईदसाठी सातारकर सज्ज झाले आहेत.
ईदचा दिवस हा बक्षिसाचा दिवस असतो. त्यामुळे गरीब व्यक्ती देखील ईद चागंल्या प्रकारे साजरी करण्याचा प्रयत्न करतात. रमजान ईदच्या पूर्वसंध्येला बाजारपेठत सुका मेवा, विविध प्रकारचे अत्तर, टोप्या, जॅकेट, महिलांसाठी अनारकली ड्रेस, विविध शोभेच्या वस्तू खरेदीसाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली होती.
चंद्र दर्शन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ईद साजरी केली जाते. या दिवशी समाजात कोणीही उपाशी राहू नये, यासाठी नमाज पठणाअगोदर जकात, कितरा व सदका (दान) देण्यात येते. आपापसातील मतभेद दूर करून बंधूभावाने राहण्यासाठी ईदच्या दिवशी गळाभेट करण्यात येते. त्यानंतर मनाचा गोडवा कायम राहावा, यासाठी ईदचा खास मेनू असणारा शिरखुर्मा दिला जातो.
समाजातील कोणतीही व्यक्ती उपाशी राहू नये, या उद्देशातून या महिन्यात मोठ्या प्रमाणात आपल्या कमाईतील काही रक्कम गरजू व गरीब लोकांना देण्यात येते. ‘ईद’ हा आनंदाचा व देवाकडून बक्षीस मिळण्याचा दिवस आहे. हा दिवस आठवणीत राहावा म्हणून घराच्या रंगरंगोटीपासून सर्व तयारी करण्यात आली आहे.
१७ टन गहूवाटप
रमजान महिन्यात उपवास ठेवून ईदच्या नमाज पठणाअगोदर ‘कितरा’ म्हणजेच गहू गरिबांना वाटला जातो. २७ व्या उपवासापासूनच गरिबांना गहूवाटप केला जातो. लहान असो, वा मोठा. प्रत्येकाला या महिन्यात अडीच किलो गहूवाटप करावाच लागतो. जिल्ह्यात गेल्या एक
आठवड्यात सुमारे १७ टन म्हणजेच १७ हजार किलो गहूवाटप करण्यात आला आहे.
गरिबांनी घेतला जकातीचा लाभ
मुस्लीम समाजात मिळकतीच्या अडीच टक्के रक्कम ही ‘जकात’ म्हणजेच धार्मिक कर म्हणून देण्यात येते. जिल्ह्यातील गरीब व गरजू लोकांना ही जकात देण्यात येते. सोने-चांदीच्या आजच्या दराच्या अडीच टक्के रक्कमही धार्मिक कर म्हणून देण्यात येते. आजारी व्यक्तीला औषधोपचार, कपडे, धान्य अशा स्वरूपातही जकात दिली जाते.