कुंभार यांच्या मदतीला सरसावले हात
By Admin | Updated: August 20, 2016 22:50 IST2016-08-20T22:49:14+5:302016-08-20T22:50:23+5:30
मार्डीकरांनी दाखवली माणुसकी : ‘सोशलमिडिया’ची किमया -- गुड न्यूज

कुंभार यांच्या मदतीला सरसावले हात
पळशी : सोशल मीडियाचा वापर योग्य कारणासाठी व योग्य पद्धतीने केला तर मदतीचे शेकडो हात सरसावतात आणि माणुसकीचे दर्शन घडवतात असेच उदाहरण मार्डी, ता. माण येथे पाहावयास मिळाले.
मार्डी, ता. माण येथील विलास रामचंद्र कुंभार हे एसटीत चालक म्हणून काम करतात. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. दोन्ही मुलींची लग्न झाली आहेत तर मुलगा अकरावीत शिकतो आहे. दोन महिन्यांपूर्वी त्यांची पत्नी अनिता कुंभार (वय ४२) यांना पॅरालिसीसचा अॅटॅक आला आणि त्याचा परिणाम मेंदूवर होऊन मेंदूच्या शिरा फुटल्याने त्यांना सातारा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले तेथे त्यांच्या मेंदूचे आॅपरेशन करण्यात आले. त्यासाठी सुमारे पाच लाखांवर खर्च झाला.
विलास कुंभार यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असून, त्यांना शेतीही नाही. दोन मुलींच्या लग्नासाठी काढलेल्या कर्जाच्या ओझ्यात ते पुरते बुडले असतानाच पत्नीच्या आजारपणाने त्यांना हतबल केले. पैसा येण्याचे इतर कोणतेच साधन नसल्याने पत्नीला जगवायचे कसे? या विवंचनेत असतानाच मार्डीतील ग्रामस्थ त्यांच्या मदतीला धावले.
मार्डी येथील अभय पोळ या युवकाने विलास कुंभार यांना मदत मिळण्यासंदर्भातील व्हॉट्सअॅप पोस्ट ‘मार्डी ग्रामविकास’ या व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकली. ही पोस्ट गेल्या आठ ते दहा दिवसांपासून व्हॉट्सअॅपवरील विविध ग्रुपवरून वेगाने फिरत होती. तसतसा मार्डी ग्रामस्थांतून मदतीचा ओघ सुरू झाला. लोकांनी जमेल तेवढी व जमेल तशी मदत त्यांच्या स्टेट बँकेच्या खात्यावर तर काहींनी सातारा येथील मंगलमूर्ती केअर टेकर या सध्या उपचार घेत असलेल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन दिली.
अनिता कुंभार यांचा रोजचा उपचाराचा खर्च तीन ते चार हजारांच्या घरात आहे. अशावेळी डॉ. माधव पोळ, पांडुरंग पोळ, उत्तम काळे, हिंदुराव पोळ, महेश पोळ, रामदास काटकर, नारायण नारायणे, पांडुरंग घाडगे, शिवाजी पोळ, दशरथ पोळ, दीपक पोळ आदींसह ग्रामस्थ मदत पाठवत आहेत तर आणखी मदत मिळण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्न करत आहेत. (वार्ताहर)
लोकांच्या मदतीमुळेच मला माझ्या पत्नीचा इलाज करता येतोय. देवदूत होऊन मला आर्थिक मदत करणाऱ्या सर्वांचा मी खरोखरच आभारी आहे.
- विलास कुंभार, मार्डी