भ्रष्टाचारात बरबटले पालिका प्रशासनाचे हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:16 IST2021-02-05T09:16:39+5:302021-02-05T09:16:39+5:30
सातारा : पालिका प्रशासनाने कोरोना प्रतिबंधासाठी कोट्यवधींचा खर्च केला. मोठ्या प्रमाणात साहित्यसामग्री खरेदी केली. मात्र, नेमके कोणते साहित्य खरेदी ...

भ्रष्टाचारात बरबटले पालिका प्रशासनाचे हात
सातारा : पालिका प्रशासनाने कोरोना प्रतिबंधासाठी कोट्यवधींचा खर्च केला. मोठ्या प्रमाणात साहित्यसामग्री खरेदी केली. मात्र, नेमके कोणते साहित्य खरेदी केले, ते कोणाला दिले याचा प्रशासनाने खुलासा करावा. कोरोनाच्या खर्चात प्रचंड भ्रष्टाचार झाला असून, यात प्रशासनाचेच हात बरबटले आहेत, असा घणाघाती आरोप सत्ताधारी आघाडीचे नगरसेवक वसंत लेवे यांनी केला.
सातारा पालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी सकाळी ११ वाजता ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. सभा सचिव हिमाली कुलकर्णी यांनी मागील सभेचे इतिवृत्त सभागृहापुढे मांडले. यानंतर सभेला सुरुवात झाली. सभेच्या प्रारंभी नगरसेवक बाळू खंदारे यांनी पालिका कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहन भत्त्याचा विषय चर्चेस आणला. राज्य शासनाने प्रतिमाह एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता द्यावा, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार पालिकेने कर्मचाऱ्यांना आठ ते दहा महिन्यांचा प्रोत्साहन भत्ता देणे अपेक्षित होते. मात्र, केवळ एक हजार रुपये देऊन कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार प्रशासनाने केला आहे. हा अन्याय कदापी सहन करणार नाही.
खंदारे यांच्या प्रश्नाला नगराध्यक्षा माधवी कदम यांनी उत्तर दिले. आगामी बजेटमध्ये प्रशासनाकडून याबाबतची तरतूद केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
नगरसेवक वसंत लेवे यांनी कोरोना काळात खरेदी करण्यात आलेले साहित्य व त्याच्या खर्चाच्या विषयावरून प्रशासनाला धारेवर धरले. लाखो रुपयांचे साहित्य तातडीने खरेदी करण्यात आले. मात्र, कोणते साहित्य खरेदी केले, कोणाला दिले याचा खुलासा आरोग्य अधिकाऱ्यांनी करावा, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, अधिकारी उपस्थित नसल्याने मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी, याबाबतची सविस्तर माहिती घेतली जाईल, असे सांगितले. तोपर्यंत हा विषय तहकूब करण्यात यावा, तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी लेवे यांनी केली. नगराध्यक्षा माधवी कदम यांनी, साहित्य खरेदी व खर्चाचा विषय तहकूब करण्याबरोबरच संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना मुख्याधिकाऱ्यांना केल्या.
सभेच्या सुरुवातीपासूनच तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. नगरसेवकांचा आवाज न येणे, चित्र न दिसणे, अशा समस्या सातत्याने येत होत्या. ऑनलाईनच्या घोळात कोणत्याही विषयाची तपशीलवार माहिती न देता ४२ पैकी ४१ विषय मंजूर करण्यात आले. वर्षभरानंतर झालेली सभा केवळ तासात गुंडाळण्यात आली.
(चौकट)
मुदत पूर्ण, तरी ठेका सुरू
पालिकेच्या विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा विषय चर्चेस आल्यानंतर नगरसेवक वसंत लेवे यांनी प्रशासनाचा समाचार घेतला. संबंधीत ठेकेदाराची मुदत दोन वर्षांपूर्वी संपली असताना हा ठेका कोण चालवत आहे, कर्मचाऱ्यांना ठरल्याप्रमाणे वेतन दिले जात आहे की नाही, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. या ठेक्याची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी लेवे यांनी केली.
(चौकट)
खासदार, आमदारांच्या अभिनंदनाचा ठराव
खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकतेच ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन केले. शिवाय वैद्यकीय महाविद्यालय व शिवाजी विद्यापीठाचे केंद्र साताऱ्यात सुरू करण्यासाठी देखील ते प्रयत्न करीत आहेत. तसेच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी हद्दवाढ, कास धरणासाठी निधी व वैद्यकीय महाविद्यालयासाठी पाठपुरावा केल्याने दोन्ही राजेंच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी करण्यात आला.
(पॉर्इंटर)
कोण, काय म्हणाले
माधवी कदम : सभेला न सांगता गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करावी
वसंत लेवे : जे आरोग्य निरीक्षक निलंबित झाले, त्यांची सही टिपणीवर चालते. मग ते अधिकारच प्रशासनाला का चालत नाहीत.
धनंजय जांभळे : सभा ऑफलाईन होणे अपेक्षित होते. मात्र, सातारा विकास आघाडीने ऑनलाईन सभा घेऊन सर्व विषय मंजूर करण्याचा घाट घातला.
अविनाश कदम : पालिकेची नुकतीच हद्दवाढ झाली आहे. या भागातील घरपट्टी वाढीच्या निर्णयावर प्रशासनाने प्राधान्याने विचार करावा, मगच निर्णय घ्यावा.
बाळू खंदारे : कोरोना काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना केवळ एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देऊन प्रशासनाने कर्मचाऱ्यांची अवहेलना केली आहे.
लोगो : सातारा पालिका सर्वसाधारण सभा