मनोमिलनाचा कारभार म्हणजे बोरीचा बार
By Admin | Updated: August 6, 2015 21:37 IST2015-08-06T21:37:39+5:302015-08-06T21:37:39+5:30
सातारा पालिका सभा : खासदारकी, आमदारकीच्या निवडणुकीत काम करण्यावरून नगरसेवकांमध्ये तू-तू मै-मै

मनोमिलनाचा कारभार म्हणजे बोरीचा बार
सातारा : पालिकेची सर्वसाधारण सभा पहिल्यांदाच तब्बल अडीच तास चालली. या सभेत दोन्ही आघाड्यांच्या नगरसेवकांनी एकमेकांची उणी-धुणी काढली. तसेच खासदारकी आणि आमदारकी निवडणुकीत काम न केलेल्यावर शंका आणि निष्ठा यावर चांगलीच चर्चा रंगली. विरोधी पक्षनेत्यांनी हे मनोमिलन म्हणजे बोरीचा बार असल्याची जळजळीत टीका केल्याने सभा वादळी ठरली.पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात नगराध्यक्ष सचिन सारस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत ६२ विषय मंजूर झाले. गोखले हौद सुशोभीकरण विषयावरुन स्वीकृत नगरसेविका हेमांगी जोशी आणि नगरसेवक अविनाश कदम यांच्यात कलगीतुरा रंगला. हेमांंगी जोशी यांनी ‘हे काम खासदार फंडातून मंजूर झाले असताना विषयपत्रिकेवर हा विषय कसा आला? प्रशासनाशी पत्रव्यवहार केला असता त्यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही. नगरसेवकांच्या पत्रांना केराची टोपली दाखवली जाते. प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करत आहे?’ असा सवाल उपस्थित केला. किशोर गोडबोले हे नगरसेवक असताना हे काम मंजूर झाले होते. परंतु हे काम करता येऊ नये यासाठी त्याठिकाणी अतिक्रमण केले त्याच संस्थेच्या शिफारशीवरुन काम करण्याचा घाट घातला जात आहे. हे सर्व कशासाठी ? हे काम खासदार फंड आणि पालिका या दोन्हीच्या माध्यामातून करावे, अशी मागणी त्यांनी केली. त्याला नगरसेवक अविनाश कदम यांनी आक्षेप घेतला. प्रभागातील सर्वांना कोणाला कोणाचा विरोध आहे हे माहीत आहे. मंंगळवार तळ्याचा प्रत्येकवेळी विषय सांगितला जातो. परंतु मी दरवेळी या कामासाठी खासदारांचा उल्लेख करतो. तळयातील कारंज्याचा विषय खासदारांनी सांगितल्यावर थांबवला. मनोमिलन असताना हे काय चालले आहे? मला तर हे षडयंत्र वाटत आहे. खासदारकीच्या निवडणुकीच्यावेळी मतभेद निर्माण झाले तरी आम्ही तेव्हा काम केलेच ना, असे नगरसेवक अविनाश कदम यांनी सांगताच त्यांच्या या वक्तव्यावर अॅड. बनकर यांनी आक्षेप घेतला. ‘म्हणजे आम्ही आमदारकीच्या निवडणुकीत काम केले नाही, असे तुम्हाला म्हणायचे आहे का,’ असा प्रश्न त्यांनी विचारला. खासदारकी आणि आमदारकी निवडणुकीचा मुद्दा या निमित्ताने चर्चिला गेल्याने इतर नगरसेवकांच्या भुवया उंचावल्या. (प्रतिनिधी)
फुटका तलावरून रंगला वाद !
नगरसेवक रविंद्र पवार आणि मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्यात फुटका तलावावरून वाद रंगला. नगरेसवक पवार म्हणाले, फुटका तलावाशेजारी चंद्रशेखर चोरगे यांनी अतिक्रमण केले असून न्यायालयाने ते काढून टाकण्याचा आदेश दिला आहे. परंतु पालिकेने नोटीस बजावण्यापलीकडे कोणतीही कारवाई केली नाही. सर्वसामान्यांच्या अतिक्रमणांंवर, फुटपाथवर बसणाऱ्यांवर लगेच कारवाई होते. परंतु धनदांडग्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुुळे मुुख्याधिकाऱ्यांनी यावर खुलासा करावा अन्यथा त्यांच्या केबिनपुढे उपोषण करण्याचा त्यांनी इशारा दिला. त्याला उत्तर देताना मुख्याधिकारी बापट म्हणाले, या प्रकरणातील जागा ही पालिकेच्या मालकीची नाही. न्यायालयात सुरु असलेल्या दाव्यात पालिका प्रतिवादी आहे. न्यायालयाने पाडून टाकावा असा आदेश दिलेला नाही. ज्या विभागाची जागा आहे त्या विभागाने पालिकेला जर सांगितले तर ते पाडता येईल. असे स्पष्टीकरण दिले.