अतिक्रमणावर हातोडा, मग समस्यांवर तोडगा कधी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:38 IST2021-03-20T04:38:51+5:302021-03-20T04:38:51+5:30

खंडाळा : खंडाळा नगरपंचायतीच्या हद्दीत महसूल विभाग, नगरपंचायत, बांधकाम व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करीत अतिक्रमणविरोधात धडक मोहीम ...

Hammer over encroachment, then when to solve problems? | अतिक्रमणावर हातोडा, मग समस्यांवर तोडगा कधी ?

अतिक्रमणावर हातोडा, मग समस्यांवर तोडगा कधी ?

खंडाळा : खंडाळा नगरपंचायतीच्या हद्दीत महसूल विभाग, नगरपंचायत, बांधकाम व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करीत अतिक्रमणविरोधात धडक मोहीम राबविली. रस्त्याच्या दुतर्फा असणारे अतिरिक्त बांधकाम, पत्र्याचे शेड, टपऱ्या हटवून अतिक्रमण काढण्यात आले. त्यामुळे अनेक वर्षांनंतर खंडाळा शहराने मोकळा श्वास घेतला असला तरी छोट्या व्यावसायिकांना यामुळे मोठा धक्का बसला आहे. यातून शहर हळूहळू सावरत आहे. मात्र, अतिक्रमणावर हातोडा मारणाऱ्या प्रशासनाने शहरात मूलभूत सुविधाही तातडीने द्याव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

शहरात नगरपंचायतीने संयुक्तपणे अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविली. याला स्थानिक रहिवासी व दुकानदारांनी सहकार्याची भूमिका घेतली. काही ठिकाणी पूर्वसूचना न देताही कारवाई झाली तरीही लोकांनी सहकार्य केले. मात्र, अशी सडेतोड कारवाई करण्याची भूमिका घेणाऱ्या प्रशासनाने लोकांच्या समस्यांवरही तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.

अतिक्रमण कारवाईनंतर दुकानांची, टपऱ्यांची झालेली तुटफूट सावरण्याचे काम व्यावसायिकांकडून दिवसभर चालू होते. त्याचबरोबर शहरातील रस्त्यावरचा सर्व कचरा काढून साफसफाईचे काम नगरपंचायतीकडून सुरू होते. अतिक्रमण काढली आता रस्त्यात येणारे विजेचे खांब, टेलिफोनचे खांब काढून गटार रस्त्याच्या कडेने घेण्यात यावेत, म्हणजे रस्ता पूर्णत: खुला होईल, तसेच फुटपाथची दुरुस्ती तातडीने करावी, तसेच शहराच्या सर्व भागांत नियमित पाणीपुरवठा करावा, अशीही लोकांची अपेक्षा आहे.

(कोट..)

शहरातील अतिक्रमण हटवले ही प्रशासनाची कामगिरी कौतुकास्पद आहे. मात्र, रस्ता रुंदीकरणात येणारे विजेचे खांब तातडीने काढावेत. या कारवाईत तुटलेले नळ कनेक्शन, विजेचे कनेक्शन पुन्हा जोडून द्यावेत. रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या गटाराची व्यवस्था करावी आणि नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करावा, अशा माफक अपेक्षा लोकांच्या आहेत. -प्रकाश गाढवे, अध्यक्ष, राष्ट्रीय काँग्रेस खंडाळा

कोट..

शहरात प्रशासनाने अतिक्रमण मोहीम राबविली, ही बाब चांगली आहे. मात्र, त्याची पद्धत चुकीची होती. स्थानिक रहिवासी व दुकानदारांना याबाबत कोणतीही नोटीस दिली नाही. अतिक्रमण काढण्यासाठी कालावधी दिला नाही. गावातील रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे; पण त्यांनी नगरपंचायतीकडून नोटीस देणे गरजेचे होते. या कारवाईत सर्वांना समान न्याय दिला नाही. दुजाभाव करून केलेली कारवाई योग्य नाही.

-शैलेश गाढवे, रहिवासी खंडाळा

19खंडाळा

फोटो : खंडाळा येथे अतिक्रमण कारवाईत व्यावसायिक झालेले नुकसान सावरत आहेत.

Web Title: Hammer over encroachment, then when to solve problems?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.