बडी धेंडे सोडून गोरगरिबांवर हातोडा
By Admin | Updated: November 14, 2014 23:20 IST2014-11-14T22:31:53+5:302014-11-14T23:20:42+5:30
अजब मोहीम : शस्त्रे पालिकेत; अतिक्रमण हटवणारी टीम रणांगणात

बडी धेंडे सोडून गोरगरिबांवर हातोडा
सातारा : ‘कोणताही दुजाभाव न ठेवता शहरातील सर्व अतिक्रमणे काढली जातील,’ असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितल्यानंतर ही अतिक्रमण मोहीम ‘आर या पार’ अशी भूमिका घेऊन रणांगणात उतरेल, असे समस्त सातारकरांना वाटले होते; मात्र ते सपशेल फोल ठरले. म्हणे, युद्धभूमीवर जाताना शस्त्रे सोबत घेऊन जावे लागते; परंतु आपल्या पालिकेचे कर्मचारी मात्र शस्त्रे म्यान करून रणांगणात उतरले आहेत. त्यामुळे सध्या सुरू असलेली अतिक्रमण मोहीम म्हणजे ‘गरीब हटाव; श्रीमंत बचाव’ अशीच आहे.
शहरात तब्बल ४९९ अतिक्रमण असल्याचे समोर आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी दीड दिवस लाक्षणिक उपोषण केले. त्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तत्काळ अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यास सांगितले. त्यानुसार गेल्या चार दिवसांपासून शहरात अतिक्रमण मोहीम सुरू आहे. परंतु ही मोहीम नेमकी कशी सुरू आहे, याची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता. ही मोहीमही पारंपरिकच वाटली. म्हणजे, या मोहिमेत आक्रमता नाही. वर्षातून एक-दोनवेळा मोहीम हाती घ्यायची आणि परत गुंडाळायची, अशीच या मोहिमेची स्थिती आहे. थातूरमातूर पानटपऱ्या, वडापावचे गाडे, झोपड्या या व्यतिरिक्त ही मोहीम पुढे सरकलीच नाही. जी अतिक्रमण हाताने काढण्यासारखी आहेत. त्यालाच हे कर्मचारी प्राध्यान्य देत आहेत. या मोहिमेला बुलडोजर उपलब्ध झाला नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचाही नाईलाज आहे. परंतु, बुलडोजरशिवाय अतिक्रमण मोहीम सुरू करणे पालिकेचे कर्मचारी विचारही करू शकत नाहीत. परंतु अशी मोठी ‘शस्त्रे’ घरी ठेवून मोहिमेत उतरून पालिकेच्या हाती काही लागणार नाही, हेही कर्मचारी जाणून आहेत. रस्त्याच्या आजूबाजूला असणारी अतिक्रमणे ही भुईचक्राप्रमाणे उगवत असतात. पुढे अतिक्रमण काढत गेल्यानंतर काही दिवसांतच ती पुन्हा उभारी घेतात. हे सर्वश्रूत आहे; परंतु ज्यांनी खरोखरच अवैध बांधकाम करून पालिकेची जागा बळकावली आहे. अशा लोकांचे अतिक्रमण काढताना बुलडोजरशिवाय पर्याय नाही. हे पालिकेच्या अधिकाऱ्यांना कोण सांगणार.
शुक्रवारी अतिक्रमण मोहिमेदरम्यान एक किस्सा घडला. बुलडोजरची किती निंतात गरज आहे, हे आपल्या लक्षात येईल. पाचशे एक पाटीजवळील एक किराणा मालाचे दुकान सिमेंट काँक्रीटमध्ये बांधकाम करण्यात आले आहे. हे दुकान जमीनदोस्त करायचे असल्याने अतिक्रमण हटाव मोहिमेचे कर्मचारी तेथे पोहोचले. त्या दुकानातील लोकांना त्यांनी साहित्य बाजूला करायला सांगितले. तर त्यांनी ‘करतो’, असे सांगून टाईमपास सुरू केला. पालिकेचे कर्मचारी मात्र त्यांच्याकडे बघत बसले. बुलडोजर असता तर त्याच्या धाकाने दुकानदाराने आपले साहित्य लगेच गुंडाळून ठेवले असते. बांधकाम पाडण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांकडे साहित्य काहीच नाही, हे त्या दुकानदारालाही माहीत होते. शेवटी पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा रागरंग पाहिल्यानंतर त्या दुकानदाराने दुकानाला स्वत: हून टाळे ठोकले. डोळ्यादेखत हा प्रकार घडत असताना कर्मचाऱ्यांना काहीच करता आले नाही.
‘परत येतो,’ असे म्हणून कर्मचाऱ्यांना दुसरे ठिकाण शोधावे लागले. (प्रतिनिधी)
धनदांडग्यावर बुलडोजर कधी फिरणार
पालिकेने अतिक्रमण मोहीम सुरू केली आहे, याचे सगळ्यानांच समाधान आहे. मात्र, ही मोहीम सुरू होऊन चार दिवस झाले. या चार दिवसांत पालिकेच्या खात्यात केवळ पाच-सात अतिक्रमणे पडली आहेत. यामध्ये एक झोपडी, एक टेरेस, गॅरेज आणि एक दोन पानटपऱ्या या शिवाय काहीच नाही. धनदांडगे मात्र कोसोदूर आहेत. तोंड पाहून की केवळ राजकीय द्वेषातून ही मोहीम सुरू आहे, याची नागरिकांना शंका येऊ लागली आहे. सरसकट सगळ्यांवर बुलडोजर फिरला तर पालिकेकडे बोट दाखविण्यास जागा उरायची नाही. गोरगरिबांना रस्त्यावर आणताना धनदांडग्यांचीही यातून सुटका होता कामा नये, एवढीच सातारकरांची अपेक्षा आहे.
ज्या लोकांनी अवैध बांधकाम केले आहे, अशा लोकांचेच आम्ही अतिक्रमण काढत आहे. यामध्ये कसलाही भेदभाव केला जात नाही. अजून अतिक्रमण मोहीम सुरू आहे. ज्यांची यादीत नावे आहेत. त्यांची नक्कीच अतिक्रमणे काढली जातील.
-अभिजित बापट,
मुख्याधिकारी, सातारा नगरपालिका