मलकापूर पंचायतीचा अतिक्रमणावर हातोडा
By Admin | Updated: January 21, 2015 23:50 IST2015-01-21T22:12:10+5:302015-01-21T23:50:18+5:30
शाब्दिक चकमक : पोलीस संरक्षणात तीस वर्षांपूर्वीची भिंत पाडली

मलकापूर पंचायतीचा अतिक्रमणावर हातोडा
मलकापूर : मलकापूर नगर पंचायतीच्या हद्दीत नव्यानेच समाविष्ट झालेल्या नेहरूनगर कॉलनीत बुधवारी पोलीस संरक्षणात तीस वर्षांपूर्वीचे अतिक्रमण काढण्यात आले़ यावेळी कॉलनीतील नागरिक व अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली़
बनपूरकर कॉलनी हा त्रिशंकू भाग अनेक वर्षांपासून कऱ्हाड किंवा मलकापूर नगरपंचायतीत समाविष्ट नव्हता. स्वतंत्र अस्तित्व असलेल्या या भागात १८ ते २० लोकांनी एकत्र येऊन नेहरूनगर ही कॉलनी १९८५ रोजी स्थापन केली़ दोन्ही बाजूला घरे बांधून दहा फुटांचा रस्ता सर्वांच्यासाठी खुला ठेवला़ कॉलनीच्या दक्षिणेकडील बाजूस दहा फुटांच्या रस्त्यालगतच भिंत बांधून हा रस्ता कॉलनीपुरता मर्यादित ठेवण्यात आला़ कालांतराने दक्षिणेकडील बाजूला चार-पाच बंगल्याची नवीन वसाहत निर्माण झाली़
या वसाहतीला ये-जा करण्यासाठी कोठूनही रस्ता उपलब्ध नाही़ त्यामुळे या नवीन वसाहतीमधील नागरिकांनी अनेकवेळा पाठपुरावा करूनही रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नव्हता़ बनपूरकर कॉलनीसह काही सर्व्हे नंबर हद्दवाढीत मलकापूर नगरपंचायतीच्या हद्दीत समाविष्ट झाले़ या सर्व कॉलन्यांमधून पाणी, वीज यासारख्या प्राथमिक सुविधाही नगरपंचायतीने पुरवल्या आहेत़ नागरिकांची अडचण विचारात घेऊन हा रस्ता खुला करण्यासाठी दोन वर्षांत कागदपत्रांची पूर्तता करून तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाने बुधवारी ही तीस वर्षांपूर्वीची अतिक्रमणात असलेली भिंत पाडण्यात आली़ यावेळी नगरअभियंता श्रीकांत शिंदे, रामभाऊ शिंदे यांच्यासह दहा ते पंधरा कर्मचारी या धडक मोहिमेत सहभागी झाले होते़ यावेळी नेहरूनगर कॉलनीतील नागरिकांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता अधिकारी व नागरिकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली़
पोलीस अधिकाऱ्यांसह २० ते २५ कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात ही अतिक्रमणातील भिंत पाडण्यात आली़ (प्रतिनिधी)
कायदेशीर कारवाई करा
संबंधित चार घरांतील लोकांची तक्रार बेकायदेशीर आहे. हा रस्ता आम्ही कोणत्याही पालिकेला लिहून दिलेला नाही़ १९८५ पासून आम्ही आमच्या खर्चानेच रस्ता बनवलेला आहे़ हा भिंत पाडण्याचा आदेश रद्द करण्याची लेखी मागणीही तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे़ तरीही आज दांडगावाने ही भिंत पाडून कॉलनीतील नागरिकांवर अन्याय केला आहे़ या सर्व प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पांडुरंग कांबळे, प्रशांत चव्हाण, इनाईस मुल्ला यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.