अर्ध्यावर गाव दिसतं सोन्याहून पिवळं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:44 IST2021-09-12T04:44:05+5:302021-09-12T04:44:05+5:30
प्रत्येक गावाच्या नावामध्ये काहीतरी वेगळंपण दडलेले असते. त्यामुळे त्या गावाला वेगळी ओळख निर्माण होते. काहींना विशेष ठिकाणामुळे, पारंपरिक संस्कृतीमुळे ...

अर्ध्यावर गाव दिसतं सोन्याहून पिवळं
प्रत्येक गावाच्या नावामध्ये काहीतरी वेगळंपण दडलेले असते. त्यामुळे त्या गावाला वेगळी ओळख निर्माण होते. काहींना विशेष ठिकाणामुळे, पारंपरिक संस्कृतीमुळे किंवा व्यक्तीमुळे ओळखले जाते. तसेच कऱ्हाड तालुक्यातील वडगाव हवेली गावाला ‘हळद’ पिकामुळे स्वत:ची ओळख निर्माण झाली आहे. येथील शेतकरी दरवर्षी हजारो क्विंटल हळदीचे उत्पादन घेतात आणि हे करीत असताना दरवर्षी नवनवीन तंत्रज्ञान तसेच आधुनिक पीक पद्धतीचाही त्यांच्याकडून वापर केला जातो.
वडगाव हवेली गावाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी सुमारे १ हजार २०० एकर क्षेत्र पिकावू असून, त्यापैकी सुमारे ४०० ते ४५० एकर क्षेत्रावर हळदीची लागण होते. वडगाव हवेली गावासह परिसरातील कार्वे, शेरे, दुशेरे आदी गावांमध्येही ऊसाबरोबरच हळद पीक घेतले जाते. वडगाव हवेली गावाला हळद या पिकासाठी पोषक वातावरण असल्याने पूर्वीपासूनच हळद हे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. पूर्वीच्या काळी काही बागायती क्षेत्रावरच लागण केली जात असे; पण कालांतराने बागायती क्षेत्रात वाढ झाल्याने सध्या बहुतेक शेतकरी हळदीकडे वळताना दिसतात.
हळदीच्या बियाण्याचे सर्वसाधारण ‘सेलम’ व ‘कडपा’ हे दोन प्रकार या परिसरात पाहावयास मिळतात. त्यापैकी ‘सेलम’ला उत्पन्न कमी; पण दर चांगला मिळत असल्याने हा प्रकार प्रामुख्याने येथे पिकविला जातो. हळद पिकासाठी निचरा होणारी जमीन आवश्यक असते. हळद पिकाचा कालावधी साधारण आठ ते नऊ महिने इतका असून, सर्वसाधारण अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर व या दरम्यान हळदीची लागण होते. लागणीनंतर हळदीला सुरुवातीचे तीन-चार पाणी जलद दिले जातात. ठिबक सिंचनाच्या वापरामुळे उत्पन्नावर त्याचा चांगला परिणाम होतो.
हळद काढणी, शिजवणी आणि वाळवून झाल्यानंतर मुख्य हळद, गड्डा, लहान हळद, कणी याचे विभाजन करून पोत्यामध्ये भरून हळद बाजारपेठेकडे पाठविली जाते. वडगाव हवेली परिसरातील हळद विक्रीसाठी प्रामुख्याने सांगली बाजारपेठेकडे नेली जाते. येथे व्यापारी, दलाल यांचे प्रतवारीप्रमाणे दर ठरवतात. गावातील अनेक शेतकरी हळद पिकामुळेच लक्षाधीश झाले असून, या पिकातूनच शेतकऱ्यांनी मोठी प्रगती साधली आहे.
- संतोष खांबे
- चौकट
आधुनिक मशीनचा वापर
वडगाव हवेली परिसरातील शेतकरी पूर्वी हळद शिजवणीसाठी जिथे चूलवाण असेल त्याठिकाणी हळद नेत होते. यामध्ये वेळ व पैसा तसेच वाहतुकीसाठी मनुष्यबळ याचा खर्च येत होता; परंतु नवीन तंत्रज्ञानामुळे सध्या आधुनिक मशीनद्वारे लोकांच्या शेतात जागेवर जाऊन कमी वेळेत व कमी खर्चात हळद शिजवून दिली जाते.
- कोट
हळद हे पीक फायदेशिर आहे. गावातील बहुतांश शेतकरी या पिकातूनच चांगले उत्पादन घेतात. दरवर्षी हळद लागवडीच्या क्षेत्रात वाढ होत असून, ही बाब चांगली आहे. निश्चित दर नसला तरी चांगले उत्पन्न मिळत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा या पिकाकडे कल आहे.
- अजय जगताप, शेतकरी.
- कोट
वडगाव हवेली गावाला हळद पिकाची परंपरा असून, पूर्वीची पद्धती व सध्याचा नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये खूप बदल घडून आला आहे. आज शेतकऱ्याला उत्पादन खर्चाच्या प्रमाणात भाव मिळत नाही; मात्र हळदीच्या पिकामुळेच गावातील अनेक शेतकऱ्यांनी यश मिळवले आहे.
- प्रशांत जगताप, शेतकरी
फोटो : १०संडे०४, ०५
कॅप्शन : प्रतिकात्मक