निम्मा वेळ शिक्षणात.. निम्मा वेळ प्रवासात!
By Admin | Updated: August 12, 2015 21:51 IST2015-08-12T21:51:46+5:302015-08-12T21:51:46+5:30
कऱ्हाड तालुका : रिकाम्या वेळेत होतायत उनाड ओळखी, उचापतींना मिळतेय संधी--महाभारत प्रवासातलं...

निम्मा वेळ शिक्षणात.. निम्मा वेळ प्रवासात!
संजय पाटील- कऱ्हाड शहरात गेल्या काही वर्षांत विविध अभ्यासक्रम दाखल झाले आहेत. या अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणारे खाजगी क्लासची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. या दोन्हींचा ताळमेळ साधताना विद्यार्थ्यांना बराच मोकळा वेळ मिळतो. या वेळेतच अनेक उचापत्या होत असल्याचे चित्र कऱ्हाडात पाहायला मिळते.
गेल्या काही वर्षांत कऱ्हाडात परगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे.
वाढते अभ्यासक्रम आणि स्पर्धा यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांनी खासगी क्लासचा मार्ग स्वीकारला आहे. कॉलेज आणि क्लास यांच्या दरम्यान मिळणाऱ्या रिकाम्या वेळेत या तरूणाईची शक्ती उचापत्या करण्यात वाया जात असल्याचे चित्र दिसत आहे.
कऱ्हाड शहर व परिसरात असलेल्या महाविद्यालयांपासून काही अंतरावर खासगी क्लासेस आहेत. काही मुलांकडे गाड्या आहेत. मुली मात्र पायी प्रवास करतानाच दिसतात. महाविद्यालय ते क्लास या दरम्यानच्या प्रवासात अनेकदा मुलींचा पाठलाग करणे, अर्वाच्य भाषेत बोलणे, गाडी आडवी लावणे, जोरजोरात हॉर्न वाजवणे, यासारखे प्रकार या प्रवासादरम्यान होतात.
तरूणींना जर काही त्रास होत असेल तर व्यावसायिक आणि दुकानदार त्यांना मदत करतात. काहीदा तरूणींच्या मदतीला वाहतूक पोलीस येतात; पण जर प्रकरण हाताबाहेर जात असेल आणि तरूणीने याची माहिती घरी दिली तर भर रस्त्यावरच राडा होतो.
काहीदा मुलीही एकत्र येऊन टवाळक्या करणाऱ्या तरूणांना अडवून जाब विचारतात. पण युवकांचे अश्लील शब्द आणि मोठ्या आवाजामुळे त्यांची प्रतिकार करण्याची क्षमता कमी पडते. याच संधीचा फायदा तरूण उठवत असल्याचेही पाहायला मिळते.
वेळेचे नियोजनच नाही
विद्यार्थ्यांना महाविद्यालयांची वेळ आणि खासगी क्लास यांच्यामध्ये साधारण दोन तासांचा फरक असल्याचे चित्र दिसते. या दोन तासांत काय करायचे, हा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे असतो. महाविद्यालयात बसणेही अशक्य असते आणि क्लासलाही जाऊ शकत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना या मधल्या वेळेचे नियोजन करणे अशक्य ठरत आहे. यासाठी खासगी क्लासचालकांनी विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार बॅचेस करणे हा एक उपयुक्त पर्याय असल्याचे समोर येत आहे.