गृहप्रकल्पात दीड हजार फ्लॅट
By Admin | Updated: November 7, 2015 23:38 IST2015-11-07T22:50:35+5:302015-11-07T23:38:28+5:30
मलकापूर नगरपंचायत सभा : प्रस्ताव लवकरच; झोपडपट्टीतील रहिवाशांसाठी शंभर कोटींचा खर्च

गृहप्रकल्पात दीड हजार फ्लॅट
कऱ्हाड : कऱ्हाड नगरपालिकेने आगाशिव डोंगराच्या पायथ्याला पुनर्वसित केलेल्या अंदाजे ३३५ झोपड्यांसह २०१३ सालच्या मतदार यादीत समाविष्ट असणाऱ्या झोपडपट्टीतील रहिवाशांसाठी शंभर कोटींचा गृहप्रकल्प राबविण्यावर मलकापूर नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत चर्चा झाली. दीड हजार फ्लॅटचा प्रस्ताव लवकरच सादर केला जाणार आहे.
मलकापूर, ता. कऱ्हाड नगरपंचायतीच्या सभेत हा निर्णय झाला. या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सुनंदा साठे होत्या. उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे उपस्थित होते. शनिवारच्या सभेत एकूण २९ विषयांवर चर्चा झाली. आगाशिवनगर येथील झोपडपट्टीचा पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत विकास करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्यावर चर्चा झाली.
मनोहर शिंदे म्हणाले, ‘झोपडपट्टीतील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरविण्यासाठी नगरपंचायत ताकद लावणार आहे. दीड हजार फ्लॅटचा हा गृहप्रकल्प असून, कऱ्हाड नगरपालिकेने स्थलांतरीत केलेल्या आणि २०१३ सालच्या मतदार यादीत नावे समाविष्ट असणाऱ्यांना गृहप्रकल्पात वन बीएचके फ्लॅट दिले जाणार आहेत. यासाठी आत्ता झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाचे व्हिडिओ शूटिंग करावे अशा सूचना त्यांनी दिल्या. स्वच्छ व सुंदर मलकापूर अभियानांतर्गत शहरातील पाचशे कुटुंबांना प्रायोगिक तत्वावर प्रत्येक दोन बकेटचे वाटप केले जाणार आहे. त्यात ओला व सुका कचरा गोळा करण्यात येईल. शहरात हुल्लडबाजी वाढली असून, दंगेखोरांचा धुमाकुळ होत आहे. यावर नजर ठेवण्यासाठी नगरपंचायत कार्यक्षेत्रात जिल्हापरिषद कॉलनी, आगाशिवनगर, ढेबेवाडी फाटा, मलकापूर फाटा, भारती विद्यापीठ परिसर, लक्ष्मीनगर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यासाठी निविदा मागविण्यास सभेने मंजुरी दिली.
आगाशिवनगर झोपडपट्टीत सामुदायिक शौचालयातून बाहेर पडणाऱ्या मैलापाण्यासाठी आरसीसी पाईप टाकून सांडपाणी गटारामध्ये सोडण्यासाठी केलेल्या अंदाजपत्रकास सभेने मंजुरी दिली. मलकापूूर नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी कोयना नदीतून उपसल्या जाणाऱ्या पाण्यासाठी जलसंपदा विभागाकडे करावयाच्या करारनाम्यावर सभेत चर्चा झाली. करारनामा करण्याच्यावेळी रक्कम भरण्यास सभेने मंजुरी दिली. (प्रतिनिधी)
दमदाटी : गुन्हा दाखल करण्याचा निर्णय
नगरपालिकेने कर्मचाऱ्यांना दमदाटी करून शासकीय कामात अडथळा आणल्याचा एक प्रकार उपनगराध्यक्ष शिंदे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला. साचलेले भंगार घेऊन जाणारे ट्रॅक्टर दोन लोकांनी अडवले. त्यांनी मुख्याधिकाऱ्यांनाही अयोग्य भाषा वापरली. यावर नगरसेवक संतप्त झाले. अशा लोकांवर नगरपंचायतीमार्फत गुन्हा दाखल करावा, असा पवित्रा नगरसेवकांनी घेतला. यावर चर्चा करून शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय झाला.