निम्म्या पगाराला लागते कात्री!

By Admin | Updated: December 10, 2014 23:51 IST2014-12-10T22:31:24+5:302014-12-10T23:51:36+5:30

अनुदानाअभावी संस्था हतबल : इस हात से लो...उस हात से दो--हतबल गुरुजींचा निबंध -

Half of the scissors! | निम्म्या पगाराला लागते कात्री!

निम्म्या पगाराला लागते कात्री!

सागर गुजर - सातारा -तुम्ही डीएड-बीएड असा अथवा इंजिनिअरिंगचे पदवीधर! खासगी संस्थांमध्ये नोकरी करायची म्हटली की पगार आणि आदब या गोष्टींच्या अपेक्षेची झूल बाजूला ठेवूनच नोकरी करावी लागणार, ही आता काळ्या दगडावरची रेघ ठरत आहे. संस्थांनाही अनुदान मिळत नसल्याने ठरलेल्या पगाराच्या निम्माच पगार शिक्षकांच्या हातात पडतो, ही वस्तुस्थिती असली तरी ती जाहीरपणे कोणीही प्रकट करत नसल्याचे चित्र आहे.
दहा वर्षांपूर्वीही वेगळी स्थिती नव्हती. शिक्षक म्हणून अनुदानित संस्थांमध्ये लागायचे झाले तरीही पाच लाखांपासून १0 लाखांपर्यंत वर्गणी संबंधित संस्थेला द्यावी लागते, असे सांगितले जायचे. सध्या पदव्या हातात असल्या तरी नोकरीची खात्री कोणीच देत नसल्यानं भविष्यातील आशा मनात धरुन प्रत्येकजण खासगी संस्थांच्या दारात उभा राहतो. संस्थेलाही शिक्षकांची गरज असते; पण अनुदान मिळत नसल्यामुळे मोजक्या पगारात ज्ञानदान करण्याची अट घालून मगच अशांच्या डोक्यावर हात ठेवला जातो. मुळात घरापासून संबंधित संस्थेत जाण्यासाठी एखादा शिक्षक आपल्या गाडीच्या पेट्रोलला जेवढे पैसे घालतो, तेवढाच त्याचा पगार असतो, हे त्याचे दुर्दैव असते. त्यांच्या मुला-बाळांच्या शैक्षणिक भविष्याचे प्रश्न त्यांच्यापुढे आहे, मात्र अंधारात सावल्या जशा गडप होतात, तसाच हा प्रश्न गंभीर असून नगण्य ठरत आहे.
दरम्यान, काही संस्थांमध्ये संबंधित शिक्षकाला समजा पंधरा हजार पगाराची महिन्याकाठी तरतूद केलेली असेल तर त्यापैकी निम्मा पगार संस्थेकडे वर्ग करावा लागतो. हा संपूर्ण व्यवहार चव्हाट्यावर आल्यास नोकरी जाण्याची भीती संबंधित शिक्षकांना सतावत असल्याने याची वाच्यता निर्भीडपणे कुणी करत नाही, इतकंच.
काही खासगी अनुदानित संस्थांमधील शिक्षक भरतीचे दरही डोळे फिरविणारे आहेत. तसेच ज्यांची परिस्थिती आहे, अशांनी भरलेले पैसेही रफादफा झाल्याची उदाहरणे आहेत. साताऱ्यातील एका नामवंत संस्थेत शिक्षकाची नोकरी लावतो अशी बतावणी करुन नाईक दाम्पत्याने अनेकांना गंडा घातल्याचे काही दिवसांपूर्वीच उघड झाले होते. त्यामुळे पैसे देऊन बसणाऱ्यांची अशी अवस्था आहे तर अडचणीतून शिक्षण घेऊन कुटुंब सावरु पाहणाऱ्या नवप्रशिक्षित शिक्षकांची काय अवस्था असेल, याची कल्पनाच केलेली बरी!
काही विनाअनुदानित संस्थांमध्ये एक-दोन नव्हे तर दहा-दहा वर्षे विना पगार नोकरी करावी लागली तरी शासनाचे अनुदानच मिळत नसल्याचे चित्र कायम आहे. यातून अनेक अडचणी येत आहेत. हे काम करत असताना वयाची मुदत संपून जाते. मग अखेर घरात हातावर-हात धरुन बसण्याशिवाय या शिक्षकांवर पर्याय उरत नाही.
अनेकांची वयाची अट उलटून चालली असली तरी त्यांना नोकरीच मिळत नसल्याने खासगी शिकविण्या घेऊन ज्ञानदान करण्याकडे वळावे लागले आहे. बीएड, एमएड झालेल्या पदवीधारकांची जी अवस्था होती, तिच आता डीएड झालेल्या पदवीकाधारकांचीही झालेली आहे. नोकरी नसल्याने खिन्न मन:स्थितीत बसून राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. शासनाने गुणवत्तेच्या आधारावर नोकऱ्या दिल्या तर त्यांच्या हातातील भविष्यही चांगल्या प्रकारे फुलेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

एमआयडीसीत पडेल ते काम!
वर्गणी देण्याची ज्यांची परिस्थितीच नाही, असे पदवीधर नोकरीची वाट बघण्यात आपला वेळ घालवित होते. नोकरीसाठी अर्ज करुन मुलाखती देऊन थकलेले काही पदवीधर आता एमआयडीसीत पडेल ते काम करु लागले आहेत.

Web Title: Half of the scissors!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.