भुयाचीवाडीत जुन्या आठवणीला सलाम!

By Admin | Updated: February 9, 2015 00:48 IST2015-02-08T21:34:56+5:302015-02-09T00:48:06+5:30

युवा सरपंचाचा उपक्रम : स्वातंत्र्यानंतरचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, निवृत्त अधिकारी व वारसांचा गौरव

Hailed the old memory of Bhayachiwadi! | भुयाचीवाडीत जुन्या आठवणीला सलाम!

भुयाचीवाडीत जुन्या आठवणीला सलाम!

उंब्रज : जुन्या मंडळींचा अनेकांना अडथळा व्हायला लागतो... घर, गावचा कारभार आतातरी आम्हाला करू द्या... तुम्ही शांत देव-देव करत बसा..., असं नव्या पिढीला वाटत असतं. हे चित्र नेहमीच पाहायला मिळते. मात्र, कऱ्हाड तालुक्यातील भुयाचीवाडी याला अपवाद ठरले. भुयाचीवाडीचे युवा सरपंच संजय कदम यांनी जुन्यांच्या आठवणीला, कर्तृत्वाला समाल करणारा गौरवशाली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये ९२ वृद्ध या सत्काराने गहिवरून आले होते.भविष्याकडे वाटचाल करत असताना पाठीमागील घटना व्यक्ती विसरता कामा नये, पाठीमागील पिढीचा आदर्श मार्गदर्शन यावर भावीपिढीला वाटचाल करताना अडथळे, अडचणी कमी येतात. यासाठी भुयाचीवाडी येथील सरपंच संजय कदम यांनी स्वातंत्र्यानंतरचे गावातील जे लोक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शासकीय नोकरीतून निवृत्त झालेले अधिकारी व कर्मचारी तसेच मृतांच्या वारसांचा सत्कार केला. यावेळी झालेल्या सत्कारामुळे ९२ वृद्धांना गहिवरून आले.पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत वसलेले भुयाचीवाडीला १९७६ च्या पुराचा फटका बसला. यामुळे कृष्णाकाठावरून स्थलांतरित होऊन महामार्गालगत पुनर्वसित झालेले हे गाव. गावातील निम्म्याहून अधिक कुटुंबे मासेमारी करून उपजीविका भागवितात. सरपंच कदम यांनी ग्रामपंचायतीची स्थापन झाल्यापासून आजपर्यंतचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार केला. जे मयत झाले त्यांच्या वारसांचाही सत्कार केला.
याचवेळी गावातील दोन स्वातंत्रसैनिकांच्या पत्नी, सेवानिवृत्त शिक्षक, सरकारी कर्मचारी यांचाही गौरव केला.
अचानक आयोजन केलेल्या या कार्यक्रमामुळे सर्वांनाच सुखद धक्का बसला. त्यातील अनेकजण सुखावले होते. हे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होते. (प्रतिनिधी)

ग्रामपंचायतीची स्थापना १९७२ मध्ये झाली. यामधील पहिल्या कार्यकाळातीळ ग्रामपंचायत सदस्य वसंत राजाराम भोकरे हे ८४ वर्षीय सत्कारासाठी पिशवीसह कार्यक्रमाला हजर होते. यावरून या सत्काराचे महत्त्व किती होते हे सर्वांना समजले.
संपूर्ण कार्यक्रम झाला. यावेळी सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी विश्वास शिंदे यांच्या लक्षात आले की, विद्यमान सरपंच यापूर्वीही सरपंच होते. त्यांचाच सत्कार राहिला आहे. त्यांनी त्यांचा सत्कार गावातील सर्वांच्या वतीने केला.

Web Title: Hailed the old memory of Bhayachiwadi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.