फलटण परिसरात गारांचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:40 IST2021-04-27T04:40:58+5:302021-04-27T04:40:58+5:30

फलटण : फलटण शहरासह तालुक्‍यात सोमवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह आलेल्या जोरदार पावसाने हजेरी लावली. अनेक भागांत जोरदार गारपीट झाल्याने ...

Hail in Phaltan area | फलटण परिसरात गारांचा पाऊस

फलटण परिसरात गारांचा पाऊस

फलटण : फलटण शहरासह तालुक्‍यात सोमवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह आलेल्या जोरदार पावसाने हजेरी लावली. अनेक भागांत जोरदार गारपीट झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता. शहरातील रस्ते जलमय झाल्याने अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते.

फलटण परिसरात सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. फरांदवाडी, कोळकी, जाधववाडी, ठाकुरकी, धुळदेव, चौधरवाडी भागात पावसाचा वेग अधिक राहिला. जोरदार पावसासह गारांचा वर्षावही झाला. तालुक्‍यातील काही भागांत मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. काही वेळेतच रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले होते.

वादळी वारा सुटताच शहरासह उपनगरांमधील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. साडेपाचच्या सुमारासच मोठा काळोख पसरला होता.

बऱ्याच कालावधीनंतर गारांचा पाऊस आल्याने गारा गोळा करण्यासाठी नागरिकांची धांदल उडाली होती. गारांचे फोटो सर्वांच्या मोबाईलवरून आणि स्टेटसवरून फिरत होते. दोन तासांहून अधिकवेळ पाऊस सुरू होता. गारपिटीमुळे कांदा, आंबा, मका या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शहरातील अनेक रस्ते जलमय होऊन वाहत होते. अनेकांच्या घरांत पावसाचे पाणी शिरल्याने नुकसान झाले होते.

मागील काही दिवसांपासून शहरात उन्हाची तीव्रता अधिकच जाणवत होती.

पारा चाळिशीपर्यंत गेल्याने वातावरणात उष्मा कमालीचा वाढला होता. अचानक आलेल्या दमदार पावसाच्या हजेरीमुळे वातावरण काही प्रमाणात थंड झाल्याने उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. मागील चार ते पाच दिवसांपासून कमाल व किमान तापमानात वाढ होत होती.

फोटो : नसिर शिकलगार यांनी मेल केला आहे.

Web Title: Hail in Phaltan area