ज्ञानमंदिराची माजी विद्यार्थ्यांकडून पायाभरणी!
By Admin | Updated: May 27, 2016 00:24 IST2016-05-26T21:50:57+5:302016-05-27T00:24:19+5:30
ऐंशी लाखांची लोकवर्गणी : बिबीत कृतज्ञतेचा नवा अध्याय; शाळा इमारतीसाठी सोबती आले एकत्र

ज्ञानमंदिराची माजी विद्यार्थ्यांकडून पायाभरणी!
आदर्की : पडक्या भिंती, गळका पत्रा, कधी ढासळलेला याचा ठावठिकाणा नसलेल्या बिबी येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयात शिकलेल्या माजी विद्यार्थी व ग्रामस्थांनी लोक वर्गणीतून ८० लाखांची इमारत उभी करण्याचा निर्णय घेतल्याने बिबी पंचक्रोशीतील माजी विद्यार्थी व ग्रामस्थांनी सरस्वतीच्या ज्ञानमंदिराची पायाभरणी केली आहे.
बिबी, ता. फलटण येथे जय भवानी एज्युकेशन सोसायटी गिरवी या संस्थेने १९८१ मध्ये सरस्वती माध्यमिक विद्यालय सुरू केले. त्यामुळे कापशी, अळजापूर, मलवडी, वडगाव, कोऱ्हाळे, पिराचीवाडी, वाघोशी, मुळीकवाडी, घाडगेवाडी, बिबी पंचक्रोशीतील विद्यार्थी-विद्यार्थिंनी शिक्षण घेऊ शकल्या. त्यामधील काही विद्यार्थी परदेशात, राज्याबाहेर, राज्यात उच्चपदावर आहे. तर काहीजण शासकीय, निमशासकीय सेवक आहेत.
गावची लोकसंख्या तीन हजार; पण गावात दुष्काळ त्यामुळे ८० च्या दशकात मुंबई-पुणेचा रस्ता धरला. त्यामध्ये अनेकजण ड्रायव्हर, माथाडी कामगार गावाकडे आले की, शाळेकडे बघून आपण सुधारलो, गाव सुधारले; पण शाळेच्या पडक्या भिंती, गळके पत्रे पाहून कशी शिकत असेल भावी पिढी म्हणून पुढे जात; पण गतवर्षी माजी विद्यार्थी व ग्रामस्थांच्या मदतीने बैठक होऊन माजी विद्यार्थी ३५ हजार प्रत्येकी वर्गणी देण्याचे जाहीर केले. त्याप्रमाणे बहुतांशी विद्यार्थ्यांनी जमाही केली.
हा जमा केलेला निधी शाळेला लागणाऱ्या विधायक गोष्टींसाठी करायचा, असा निर्णय या माजी विद्यार्थ्यांनी घेतला. शाळेला निधी जमवायचा, या हेतूने सर्व सोबती एकत्र आले. शाळेचे दिवस यानिमित्ताने त्यांना पुन्हा एकत्र येण्याची संधी लाभली, त्यामुळे त्यांच्यात मोठा उत्साह निर्माण झाल्याचे पाहायला मिळत होते.
तसेच सरस्वती माध्यमिक विद्यालयाचा ढासळता बुरूज थांबण्याचा निर्णय घेऊन ८० लाखांची इमारत उभी करून त्यामध्ये प्रयोगशाळा, सभागृह, क्रीडांगण, प्रसाधन गृह असे सर्व सोयीयुक्त युनिट उभे करण्याचे निर्णय घेऊन गत महिन्यात इमारतीच्या पट्ट्या खोदून भरण्यात आला. त्यामुळे लवकरच ज्ञानमंदिर आकार घेणार असल्याचे माजी विद्यार्थ्यांनी केली. सरस्वती ज्ञानमंदिराची पायाभरणी केल्यामुळे त्याचे कौतुक होत आहे. (वार्ताहर)
पथदर्शी प्रयोग
जिल्ह्यातील शाळांतून असंख्य विद्यार्थी शिकून नोकरी-व्यवसायाला लागले. या प्रत्येकानं जर शाळेची आठवण ठेऊन पुढच्या पिढीला आणखी दर्जेदार सोयीसुविधा कशा मिळतील, यासाठी प्रयत्न केले तर किती तरी सुधारणा घडून येतील. बिबी येथील माजी विद्यार्थ्यांनी पथदर्शी प्रयोग निर्माण केला आहे.