सहायक आयुक्तांच्या खुर्चीला गुटख्याच्या पुड्यांचा हार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:38 IST2021-02-13T04:38:12+5:302021-02-13T04:38:12+5:30
सातारा : ‘अवैध गुटखानिर्मिती तसेच जिल्ह्यात संपूर्ण गुटखा विक्री बंद करण्यात यावी, अन्यथा दि. १ मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ...

सहायक आयुक्तांच्या खुर्चीला गुटख्याच्या पुड्यांचा हार
सातारा : ‘अवैध गुटखानिर्मिती तसेच जिल्ह्यात संपूर्ण गुटखा विक्री बंद करण्यात यावी, अन्यथा दि. १ मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल’, असा इशारा आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सागर भोगावकर यांनी दिला आहे. यावेळी अन्न व औषध प्रशासन सहायक
आयुक्तांच्या खुर्चीला गुटखा पुड्यांचा हार घालण्यात आला. याबाबत अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण राज्यात गुटखा बंदीचा स्तुत्य निर्णय शासनाने घेतला असला तरी या निर्णयाची कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही. आपल्या कार्यालयामार्फत जिल्ह्यामध्ये गुटखा निर्मिती व विक्री यावर ज्या पद्धतीने कारवाई व्हायला पाहिजे, त्या पद्धतीने होताना दिसून येत नाही. केवळ जुजबी व कागदोपत्री कारवाई केल्याचे दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये सातारा एमआयडीसीमध्येदेखील गुटखा निर्मिती केली जात आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये राजरोजसपणे गुटखा विक्री होत आहे. कोरोनाकाळातदेखील नागरिकांच्या तोंडामध्ये गुटखा दिसत आहे व यामुळे संपूर्ण ठिकाणी अस्वच्छता होत आहे. बरेच तरुण या व्यसनामुळे कॅन्सरसारख्या आजाराने ग्रासले आहेत. वास्तविक, विभागाकडून संबंधित गुटखा निर्मिती करणारे उत्पादक, त्यांचे डिलर यांच्यावर प्राधान्याने कारवाई करण्यात यावी, ही आग्रही मागणी आहे. यावर आपल्या प्रशासनाकडून येत्या १५ दिवसांमध्ये कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यास याच्या निषेधार्थ १ मार्चपासून लोकशाही मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा यांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे, उपोषण करण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, याची नोंद घ्यावी, असाही इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी आपचे पदाधिकारी व कार्यकर्ते महेंद्र बाचल, तात्या सावंत, संदीप माने, अजय जाधव, रोहित साळुंखे, प्रथम साळुंखे, विजयकुमार धोतमल, रजत चव्हाण, गौरव औताडे आदींची उपस्थिती होती.
१२आप
साताऱ्यात ‘आप’च्या वतीने शुक्रवारी अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्तांच्या खुर्चीला गुटखा पुड्यांचा हार घालण्यात आला.