गुरुजींवरच्या विनोदाला गुरूजनांची मनापासून दाद!

By Admin | Updated: July 19, 2016 00:17 IST2016-07-18T23:01:04+5:302016-07-19T00:17:35+5:30

गुरुपौर्णिमेनिमित्त खास कार्यक्रम : सासू सुनेच्या शाब्दिक जुगलबंदीत सापडली शिक्षकांचीही रास

Guruji's jokes are heartfelt thanks to Gurujan! | गुरुजींवरच्या विनोदाला गुरूजनांची मनापासून दाद!

गुरुजींवरच्या विनोदाला गुरूजनांची मनापासून दाद!

सातारा : खास गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षकवृंदांसाठी ‘लोकमत’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘सुनेच्या राशीला सासू’ या कार्यक्रमास गुरूजनांनी तुडुंब गर्दी केली. शाहू कला मंदिरच्या ‘हाऊसफुल्ल’ सोहळ्यात रंगमंचावरील कलाकारांनी शिक्षकांवर केलेल्या ऐनवेळच्या अनेक विनोदांना प्रेक्षकांनीही मनापासून दाद दिली.
या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व कृपा हेअर टॉनिक आणि कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स यांनी स्वीकारले होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी पुनिता गुरव, उपशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, चरक एजन्सीचे शंतनू भोईटे, कृपा हेअर टॉनिकचे संचालक चंदन दळी, केआरए ज्वेलर्सचे आकाश शेळके, कार्यकारी निर्माता विनय म्हसवेकर, प्रसिद्ध अभिनेत्री नयना आपटे यांच्या हस्ते ‘लोकमत’चे संस्थापक संपादक व थोर स्वातंत्र्यसेनानी दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून झाली.
लग्न जुळविताना मुला-मुलीची पत्रिका जुळते का ते पाहतात; परंतु या नाटकामध्ये सासूची पत्रिका सुनेबरोबर जुळते का? याची मांडणी केली आहे. वृश्चिक राशीच्या सासूला कोणत्या राशीची सून सूट होईल, यासाठी ही सासू बारा राशींच्या सुनांची संसार पाहते. यावेळी सासू सुनेच्या संवादात तुफान विनोदी हास्य शिक्षकांना खिळवून ठेवत होते.
सासू-सुनांचे नातेसंबंध आणि त्याला राशीची जोड या विषयावरचे हे तीनपात्री नाटक पाहण्यासाठी सभागृह खचाखच भरले होते. सासू-सुनांमध्ये होणारे वाद-संवाद त्याचे स्वरूप एकमेकींच्या राशीप्रमाणे कसे बदलतात, याचे चित्रण या नाटकात मनोरंजक पद्धतीने मांडण्यात आले होते. नाटकाच्या शेवटपर्यंत निखळ मनोरंजनाबरोबर हास्याचे फवारे उडत होते.
आनंद म्हसवेकर लिखित आणि दिग्दर्शित हे नाटक अभिनेत्री नयना आपटे, अभिनेत्री योगिनी पोफळे व अभिनेते मनोहर सोमण यांनी बारा राशींच्या बारा सासू आणि तितक्याच सुनांचे स्वभाव उलगडून दाखविताना त्यातील बहुतांशी प्रसंग धम्माल विनोदी केले आहेत.
कृपा हेअर टॉनिकची माहिती वर्षा गाडगीळ यांनी तर केआरए ज्वेलर्समधील दागिने व विविध योजनांची माहिती आकाश शेळके यांनी दिली. (प्रतिनिधी)


भाग्यवान विजेते जाहीर
उपस्थित शिक्षकांमधून तीन भाग्यवान विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. यामध्ये गवडी शाळेतील एस. जे. कदम, डॉ. जे. डब्ल्यू आलियन अ‍ॅकॅडमीचे धनंजय जाधव, पोदार स्कूलच्या प्रिया जगताप यांना ‘लोकमत’तर्फे सुवर्णनथ देण्यात आली. तर कृपा हेअर टॉनिकतर्फे दिलेली पैठणी तेजस्विनी मायने तर गीतांजली शिंदे साडीचे मानकरी ठरल्या.

बालविकास मंच सभासद नोंदणीला प्रारंभ
‘लोकमत’ बालविकास मंचची सभासद नोंदणी सुरू झाली असून, नोंदणी शुल्क १५० रुपये आहे. यामध्ये सभासदांना आकर्षक भेटवस्तू, लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर वर्षभर विविध कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन केले जाते. यावेळी सभासद नोंदणी भेटवस्तूचे अनावरण करण्यात आले.

Web Title: Guruji's jokes are heartfelt thanks to Gurujan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.