व्यापाऱ्यावर गुप्तीने हल्ला

By Admin | Updated: April 3, 2016 03:49 IST2016-04-03T03:49:47+5:302016-04-03T03:49:47+5:30

सांगलीतील घटना : वसुलीसाठी कृत्य; सावकारासह पाचजणांना अटक

Gupta attack on merchant | व्यापाऱ्यावर गुप्तीने हल्ला

व्यापाऱ्यावर गुप्तीने हल्ला

सांगली : व्याजाने दिलेल्या सहा हजारांच्या वसुलीसाठी बजरंग हिंदुराव दामुगडे (वय ३०, रा. सुतार प्लॉट, सांगली) या व्यापाऱ्यावर पाठलाग करून गुप्तीने हल्ला करण्यात आला. गुप्तीचा वार हनुवटीवर बसल्याने दामुगडे जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी सावकारासह पाचजणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा पाचजणांनाही अटक केली आहे.
अटक केलेल्यांमध्ये सावकार दत्तात्रय भगवान जावीर (वय ३१, रा. त्रिमूर्ती कॉलनी), शिवानंद शंकर बळवंत (२५), लक्ष्मण प्रकाश वडर (२१), रवींद्र मोतीराव भोसले (३५, तिघे रा. वडर कॉलनी) व राकेश हणमंत वडर (२२, उत्तर शिवाजीनगर, सांगली) यांचा समावेश आहे. दामुगडे यांचे किराणा मालाचे दुकान आहे. सहा महिन्यांपूर्वी कौटुंबिक अडचण निर्माण झाल्याने त्यांना दहा हजारांची गरज होती. यासाठी त्यांनी सावकार जावीरची भेट घेऊन दहा हजारांची मागणी केली. जावीरने २० टक्के व्याजदराने दहा हजार रुपये देणार, असे सांगितले. दामुगडे यांनीही ते मान्य केले. जावीरने पैसे देताना एक महिन्याचे २० टक्क्याने दोन हजार रुपये व्याज काढून घेऊन आठ हजार रुपये द्यायला पाहिजे होते. तसे न करता त्याने सहा हजार रुपये दिले. यावर दामुगडे यांनी त्याच्याकडे विचारणा केली. त्यावेळी त्याने दोन हजार रुपये दोन दिवसांत देतो, असे सांगितले. मात्र, प्रत्यक्षात त्याने दोन हजार रुपये दिलेच नाही. दामुगडे यांनी सहा हजारांची परतफेड म्हणून २२ हजार रुपये दिले होते. तरीही अजून तीन हजार रुपये देणे लागतोस, असे म्हणून जावीर त्यांना दमदाटी करीत होता. दामुगडे यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे जावीर शुक्रवारी त्याच्या चार साथीदारांना घेऊन दामुगडे यांच्या दुकानात गेला. त्याने तीन हजार रुपये देण्याची मागणी करून गुप्ती काढली. त्यामुळे दामुगडे घाबरले. दुकानातून ते पळून गेले. त्यावेळी जावीरने त्यांचा पाठलाग केला. त्यांच्यावर गुप्तीने हल्ला केला. गुप्तीचा घाव हनुवटीवर बसल्याने ते जखमी झाले.
सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार केल्यानंतर रात्री उशिरा त्यांनी शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी जावीर व त्याच्या साथीदारांविरुद्ध सावकारी, धमकावणे, मारहाण करणे असे गुन्हे दाखल केले आहेत.
घरावर छापे
पोलिस निरीक्षक शिवाजी आवटे यांनी दामुगडे यांनी फिर्याद दिल्यानंतर सावकार जावीर व त्याच्या साथीदारांचा शोध सुरू ठेवला. रात्री उशिरा त्यांच्या घरांवर छापे टाकण्यात आले. त्यावेळी पाचहीजण सापडले. हल्ल्यात वापरलेली गुप्ती जप्त करण्यात आली आहे. वसुलीसाठी जावीरने आणखी कोणाला धमकावले आहे का, याचा तपास केला जात असल्याचे पोलिस निरीक्षक आवटे यांनी सांगितले.

Web Title: Gupta attack on merchant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.