मयूरेशच्या नावाने गुणवंत खेळाडू पुरस्कार
By Admin | Updated: February 8, 2015 00:53 IST2015-02-08T00:49:35+5:302015-02-08T00:53:26+5:30
तावडे यांची घोषणा : कुटुंबीयांना पाच लाखांची मदत करण्याची ग्वाही

मयूरेशच्या नावाने गुणवंत खेळाडू पुरस्कार
मायणी : नेटबॉल खेळाडू मयूरेशचे निधन हा राज्याच्या क्रीडा क्षेत्राला मोठा धक्का आहे. जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून देण्यात येणारा गुणवंत खेळाडू पुरस्कार यापुढे मयूरेशच्या नावाने दिला जाईल. त्याचप्रमाणे त्याच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत करण्यात येईल, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.
मायणी येथील नेटबॉल खेळाडू मयूरेश पवार याचे केरळ येथील राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान निधन झाले होते. मयूरेशच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी मंत्री तावडे शनिवारी मायणीत आले होते. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत पालकमंत्री विजय शिवतारे, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, मायणी बँकेचे अध्यक्ष सुरेंद्र गुदगे, हरणाई सूतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख, गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार विवेक साळुंखे, वडूज बाजार समितीचे सभापती सोमनाथ माळी, सुधाकर कुबेर, सरपंच प्रकाश कणसे उपस्थित होते.
मायणी येथील भारत माता विद्यालयात आयोजित शोकसभेत तावडे म्हणाले, ‘ग्रामीण भागातील माध्यमिक विद्यालयात शिकणारा विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू बनतो, ही बाब कौतुकास्पद आहे. मयूरेशने १९ व्या वर्षापर्यंत राष्ट्रीय स्तरावर मजल मारली होती. मयूरेशचा लहान भाऊ आकाशच्या यापुढील सर्व शिक्षणाची जबाबदारी राज्य शासन घेईल.’
‘लोकमत’च्या वृत्तानंतर गणेशचीही भेट
मयूरेशच्या मृत्यूच्या धक्क्याने त्याचा मित्र व राष्ट्रीय खेळाडू गणेश भारत चौधरी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. यासंदर्भात वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर मंत्री विनोद तावडे यांनी मायणी येथील रुग्णालयात जाऊन गणेशला धीर दिला. त्यास आंतरराष्ट्रीय खेळासाठी शासनातर्फे मदत केली जाईल, असे सांगितले. त्याच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे देण्याची ग्वाही त्याच्या आई-वडिलांना तावडे यांनी दिली.