उपोषणकर्त्याच्या ‘विषाणू’मुळे गुंता !
By Admin | Updated: September 20, 2014 00:34 IST2014-09-19T22:29:02+5:302014-09-20T00:34:29+5:30
प्रशासनाची झोप उडाली: तक्रारदाराच्या कानात म्हणे कुणीतरी गुणगुणतंय...

उपोषणकर्त्याच्या ‘विषाणू’मुळे गुंता !
दत्ता यादव- सातारा -सातारा : चोरांच्या पाठीमागे धावणे, नेत्यांची सुरक्षा सांभाळणे, सण-उत्सवांचा बंदोबस्त अशा कामांनी त्रस्त झालेल्या पोलिसांना आणि प्रशासनालाही जेव्हा ‘आभासांवर आधारित’ धावाधाव करावी लागते, तेव्हा त्यांचे काय होत असेल..? कधी एखाद्या ‘संंशोधना’वर संशोधन करावे लागते, तर कधी केवळ शंका-कुशांकांवरून अनेकांची चौकशी करावी लागते.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही दिवसांपासून मायणी (ता. खटाव) येथील एक गृहस्थ उपोषणाला बसले आहेत. मात्र, त्यांची मागणी भन्नाट आहे. ‘महाभयानक विषाणू जगभर पसरणार आहे आणि आपल्याला त्याचा शोध लागला आहे,’ असे दावे हे गृहस्थ करीत आहेत. प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही तर ‘जगाचा नाश’ होईल, अशी भीती त्यांना वाटतेय. म्हणून गेल्या काही दिवसांपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तळ ठोकून आहेत. २०१३ पासून त्यांचा ‘लढा’ सुरू आहे. प्रशासनाने आपल्या संशोधनाची दखल घेऊन सावध व्हावे, असे त्यांचे म्हणणे आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांच्यापासून अनेकांना निवेदने धाडली आहेत. महाभयानक विषाणूचा प्रसार होणार असल्याचे भाकित करणाऱ्या या गृहस्थाचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. हा विषाणू नेमका काय आहे, याचा उलगडा ना अधिकाऱ्यांना झालाय, ना डॉक्टरांना आणि ना त्या गृहस्थांना! पण तो विषाणू ‘आहे’ हे नक्की! हा विषाणू शरीरात हळूहळू बदल घडवतो; पण त्याचे निदान होत नाही. या ‘विषाणू’ने प्रशासनाची झोप उडाली आहे. वरपर्यंत निवेदन धाडल्यामुळे नेमका प्रकार काय आहे, याची शहानिशा करण्याच्या सूचना कनिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाल्यात. त्या गृहस्थांवर मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचार सुरू आहेत. आता बोला..
एखाद्याच्या मनात अशा प्रकारे ‘विषाणू’ बसलेला असतानाच दुसऱ्याच्या ‘कानात’ तर साक्षात्कार होत आहेत. म्हणजेच, त्याला कुणाकडून धोका आहे, ते त्याच्या कानात येऊन हळूच कुणीतरी सांगत आहे. किस्सा आहे पाटण तालुक्यातील तारळे गावातला. काही दिवसांपूर्वी तारळे पोलीस चौकीत थेट पोलीस अधीक्षकांकडून चौकशीचे पत्र आले. वेखंडवाडीतील एका गृहस्थाने पोलीस अधीक्षकांना लिहिलेल्या पत्राचा तो परिणाम होता. या गृहस्थाला कानात कुणीतरी येऊन हळूच सांगत होते, की तुला अमूकतमूक व्यक्तीकडून धोका आहे आणि ती व्यक्ती तुझा खून करणार आहे.
त्याने तारळे येथील प्रतिष्ठित व्यक्तींची नावेही तक्रार अर्जात नमूद केली होती. त्यामुळे पोलीस खडबडून जागे झाले. त्यांनी संबंधितांना एकेक करून पोलीस चौकीत बोलावून चौकशी केली. त्या गृहस्थालाही बोलावण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर तो म्हणाला, ‘या साहेबांचे आणि माझे काही भांडण नाही. मात्र, रात्री मी झोपल्यानंतर माझ्या कानात कोणीतरी हळूच त्यांचे नाव सांगतंय. मला काही माहिती नाही. मला त्रास होतोय, हे मी तुम्हाला सांगतोय.’ आता या परिस्थितीत पोलिसांनी करावे तरी काय? अशा या अजब तक्रारीने पोलिसांची झोप उडाली. ‘वरून’ आलेल्या पत्रानुसार या ‘कानगोष्टी’ची शहानिशा करून पोलिसांनी अखेर प्रकरणाला पूर्णविराम दिला. मात्र, या प्रक्रियेत या गृहस्थाने ज्यांची नावे घेतली होती, त्यांना लेखी जबाब द्यावा लागला. या गृहस्थावरही मानसोपचारतज्ज्ञाचे उपचार सुरू आहेत.
नियम तारी त्याला कोण मारी?
नियमानुसार, आलेल्या प्रत्येक तक्रारीची, अर्जाची दखल घेणे पोलिसांना आणि प्रशासनाला बंधनकारक असते. समोर दिसत असलेल्या प्रकारात तथ्य नाही, हे समजत असूनही अनेकदा दखल घ्यावीच लागते. ‘पोलीस तक्रार नोंदवून घेत नाहीत,’ या नेहमी होणाऱ्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर असे किस्से केवळ मनोरंजक नव्हे, तर पोलीस आणि प्रशासनाची हतबलता स्पष्ट करणारे ठरतात.
अनेकदा मानसिक संतुलन ढासळलेल्या व्यक्ती आमच्याकडे तक्रार घेवून येत असतात. त्यांच्या तक्रारीचा सूर अजब असतो. धड त्यालाही समजत नाही आणि आम्हालाही. मात्र कायद्याचे सोपस्कार आम्हाला पूर्ण करावेच लागतात. अशा तक्रारी वेळकाढूपणाच्या असतात.
- नितीन काशीद, (पोलीस उपनिरीक्षक)