गुंड भानुदास धोत्रेसह तिघेजण तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2015 23:37 IST2015-09-17T22:22:08+5:302015-09-18T23:37:40+5:30

‘अ‍ॅक्शन प्लॅन’नुसार कारवाई : कऱ्हाडातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात

Gund Bhanudas Dhotre | गुंड भानुदास धोत्रेसह तिघेजण तडीपार

गुंड भानुदास धोत्रेसह तिघेजण तडीपार

कऱ्हाड : शहरातील वाढत्या गुन्हेगारी कारवाया व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पोलिसांनी सल्या चेप्या हल्ला प्रकरणातील गुंड भानुदास धोत्रे याला सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तर इतर दोघांना सातारा व सांगली जिल्ह्यांतून सहा महिन्यांसाठी तडीपार केले आहे.
कऱ्हाडात गत काही महिन्यांपासून गुन्हेगारी कारवाया वाढल्या आहेत. शस्त्रांची मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण होत असल्याचे व अनेकांकडे बेकाशदेशीर शस्त्र असल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चाप लावण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणाऱ्यांवर पोलिसांनी तडीपारीची कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सध्या गणेशोत्सवास प्रारंभ झाला असून, त्यातच बकरी ईद सणही जवळ आला आहे. त्यापाठोपाठ इतर सण व उत्सवही येत आहेत. त्यामुळे पोलीस दल अधिक सतर्क झाले आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील कायदा, सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी गुंडांच्या हद्दपारीचे सत्र सुरू करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या ‘अ‍ॅक्शन प्लॅन’नुसार पोलिसांनी गुंडांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीलाच पोलिसांनी सल्या चेप्या हल्ला प्रकरणातील गुंड भानुदास लक्ष्मण धोत्रे (रा. बुरुड गल्ली, शनिवार पेठ, कऱ्हाड) याच्यावर तडीपारीची कारवाई केली आहे. त्याला सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार प्रांताधिकारी किशोर पवार यांनी ही कारवाई केली.
गुंडांच्या कारवाया थोपविण्याबरोबरच घरफोडी व चोरीचे गुन्हे रोखण्यासाठीही पोलिसांनी कंबर कसली आहे. यापूर्वी घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सागर संजय शिंदे (रा. कापील) व अविनाश भीमराव सकट (रा. गोळेश्वर, ता. कऱ्हाड) या दोघांनाही सातारा व सांगली जिल्ह्यांतून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)


गुन्हेगारांवर ‘वॉच’
शहरातील इतर रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर गुन्हे प्रकटीकरण शाखा ‘वॉच’ ठेवून आहे. तसेच इतर गुंडांवरही हद्दपारीची कारवाई करण्याचे संकेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी दिले आहेत.

Web Title: Gund Bhanudas Dhotre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.