उसाला एफआरपी अन् दुधाला दरवाढ द्या!
By Admin | Updated: May 22, 2015 00:17 IST2015-05-21T22:35:36+5:302015-05-22T00:17:09+5:30
कऱ्हाडात स्वाभिमानीचा ठिय्या : ‘कुमुदा-रयत’वर कारवाईची मागणी, मनोज घोरपडेंच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते आक्रमक

उसाला एफआरपी अन् दुधाला दरवाढ द्या!
कऱ्हाड : शासन निर्णयाप्रमाणे १४ दिवसांच्या आत ऊसदर देणे बंधनकारक असताना, कोल्हापूर जिल्हा सोडला तर इतर कोणत्याही साखर कारखान्याने ‘एफआरपी’प्रमाणे ऊसदर दिलेला नाही. तसेच रयत-कुमुदा साखर कारखान्याने उसाची १५ जानेवारीनंतर बिले शेतकऱ्यांना अदा केलेली नाहीत. त्या कारखान्यांवर कडक कारवाई करावी. ‘एफआरपी’प्रमाणे दर न देणाऱ्या कारखान्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे, तसेच दुधाला दरवाढ द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी गुरुवारी कऱ्हाडात ठिय्या आंदोलन केले.
येथील तहसील कार्यालयासमोर गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जमा होऊ लागले. ‘ऊस आमच्या हक्काचा, नाही कुणाचा बापाचा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो,’ आदी घोषणांनी परिसर दूमदुमून टाकला. कार्यकर्त्यांनी तेथे सुमारे तासभर ठिय्या आंदोलन केले. त्यात मनोज घोरपेडेंसह देवानंद पाटील, सचिन नलवडे, अंजनकुमार घाडगे, धनाजी शिंदे, विकास पाटील, रोहित माने, बापूसाहेब साळुंखे, अमर कदम, राजेंद्र पाटील, संदीप पवार, कृष्णत क्षीरसागर, अमित शिंदे, जितेंद्र घोरपडे, प्रशांत कणसे, अविनाश घोरपडे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.
दरम्यान, नायब तहसीलदार ज्ञानदेव डुबल यांच्याकडे संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनात ‘एफआरपी’प्रमाणे ऊसदर न देणाऱ्या जिल्ह्यातील कारखान्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. शेतकऱ्यांना ‘एफआरपी’प्रमाणे दर लवकरात लवकर मिळावा, गायीच्या दुधाला २५ रुपये तर म्हशीच्या दुधाला ३५ रुपये लिटरप्रमाणे भाव मिळावा, शासकीय नियमांप्रमाणे दर न देणाऱ्या खासगी व सहकारी दूध संस्थांवर कारवाई करावी, अशी मागणी केली.(प्रतिनिधी)
एकीकडे अर्ज तर दुसरीकडे निवेदन
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी कृष्णा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी गर्दी केली होती. तर दुसरीकडे तहसील कार्यालय आवारात स्वाभिमानी संघटनेचे मनोज घोरपडे यांनी ऊसदराबाबत निवेदन देण्यासाठी आले असता. त्याठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली.
शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना नेहमीच अग्रेसर असते. उसाला ‘एफआरपी’प्रमाणे दर व दुधाला दरवाढ मिळणे आज अत्यंत गरजेचे बनले आहे. मात्र, याकडे संबंधितांकडून सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. आमच्या मागणीची लवकरात लवकर दखल न घेतल्यास शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार आहोत.
-मनोज घोरपडे,
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते