गट-तट विसरून विकासासाठी एकत्र या...
By Admin | Updated: November 18, 2015 00:02 IST2015-11-17T23:30:00+5:302015-11-18T00:02:55+5:30
शशिकांत शिंदे : अंगापूर तर्फ तारगाव येथील कार्यक्रमात आवाहन

गट-तट विसरून विकासासाठी एकत्र या...
अंगापूर : ‘एकीची लाट काय असते,एकीने इतिहास घडविता येतो. एकत्रित काम करण्याने अन्यायाविरूद्ध लढा उभारून सामान्य आणि कष्टकरी दीन दलित जनतेला न्याय देता येतो. यासाठी आपण ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून आदर्श परिवर्तनाची एक सुरुवात केली. भावकी गटाच्या आणि तटाच्या राजकारणापेक्षा गावच्या विकासासाठी आपण एकत्र आले पाहिजे. ही आदर्श संकल्पनेची नांदी आहे,’ असे मत आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.
ते अंगापूर तर्फ तारगाव येथे नूतन सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि स्पर्धा परीक्षेत यश संपादन करणाऱ्यांच्या आयोजित सत्कार समारंभात बोलत होते. या कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी. आर. गारळे, सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. नितीन भोसले, जि. प. सदस्या मंगलाताई घोरपडे, जि. प. सदस्य सतीश चव्हाण, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रामभाऊ जगदाळे, व्हा. चेअरमन दिलीप निंबाळकर, संचालक जयसिंग कणसे, चंद्रकांत घोरपडे, हिंगोलीचे प्रांताधिकारी अमित शेडगे, मार्केट कमिटीचे संचालक नितीन कणसे, गिरीश फडतरे, हणमंतराव कणसे, जिहेचे उपसरपंच मच्छिंद्र फडतरे, रमेश कणसे आदी मान्यवर उपस्थित होते.
आ. शिंदे म्हणाले, ‘आदर्श गाव संकल्पना राबवित असताना नुसता ग्रामस्वच्छता अभियानापुरता मर्यादित न राहता आरोग्याची शिबिरे, स्पर्धा परीक्षेसाठी मागर्दशन शिबिरे आयोजित करावी. त्यासाठी लागणारे तज्ज्ञ मार्गदर्शक, विचारवंत उपलब्ध करण्याची जबाबदारी घेतो. या तालुक्यातून परिसरातून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यशस्वी होऊन ही पिढी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यात अधिकारी म्हणून जावेत. लोकांच्या आरोग्यापासून शिक्षणापर्यंत गरीबांच्या अडचणीपासून समोरच्या व्यक्तीच्या मस्तीपर्यंत असा आदर्श पायंडा घालण्याचे काम आपण करा. त्यामध्ये जेथे मदत लागले ती मी देण्याचा प्रयत्न करेन.’
टी. आर. गारळे म्हणाले, ‘हे गाव माझ्या मार्गदर्शनाखाली आदर्श गाव संकल्पना राबविण्याचे ठरविले आहे. त्यासाठी हे गाव दत्तक घेत आहे.’
प्रारंभी काही कामांचे भूमीपूजन करण्यात आले. तर तंटामुक्ती पुरस्कारांची सन २०१४-१५ ची रक्कम मिळाली. ती रक्कम शाळेच्या प्रयोग कक्षासाठी वापरली तर डिजिटल क्लासरूमसाठी प्रोजेक्ट हा धनंजय शेंडगे यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ स्व:खर्चातून दिला. या दोन खोल्यांचे रंगकाम सोमनाथ शेडगे यांनी केले. याचे उद्घाटन आमदार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर व्यासपीठावर नवनिर्वाचित ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तर स्पर्धा परीक्षेत व इतर क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले अशा विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
माणिक शेडगे यांनी प्रास्ताविक केले तर राजेंद्र कणसे यांनी सूत्रसंचालन केले. सुशांत शेडगे यांनी आभार मानले. हा कार्यक्रम
यशस्वी होण्यासाठी धनंजय शेडगे कदम, माजी सरपंच विश्वास शेडगे, हणमंत शेडगे, तुकाराम शेडगे, सोमनाथ शेडगे, दीपक शेडगे, शफिक शेख, कृष्णात शेडगे, सतीश शेडगे, प्रशांत माळी, अशोक कुमार यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)