‘म्हैसाळ’ योजनेच्या पाण्यासाठी घेराओ
By Admin | Updated: May 4, 2015 00:35 IST2015-05-04T00:28:05+5:302015-05-04T00:35:46+5:30
मालगावमध्ये आंदोलन : शेतकरी अचानकपणे रस्त्यावर उतरल्याने पोलिसांची धावपळ

‘म्हैसाळ’ योजनेच्या पाण्यासाठी घेराओ
मालगाव : म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या शाखा अभियंत्याला घेराओ घालत मालगाव (ता. मिरज) येथील संतप्त शेतकऱ्यांनी भर उन्हात मालगाव-खंडेराजुरी रस्ता रोखून धरला. शेतकऱ्यांनी अचानकपणे घेतलेल्या या पवित्र्यामुळे पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली. दीड तास रस्ता रोखल्याने वाहतूक ठप्प झाली. अखेर पोलिसांनीच शेतकरी व अधिकाऱ्यांमध्ये मध्यस्थी केल्याने बेकायदेशीर पाणी उपसा रोखून वंचित शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
कळंबी शाखा कालव्यात पाणी सोडून वीस दिवस झाले तरी बेकायदेशीर पाणी उपशामुळे गेट क्र. १३, १४ व १५ वरील शेतकऱ्यांना योजनेच्या पाण्यापासून वंचित रहावे लागत असल्याने ते आक्रमक झाले आहेत. पाठपुरावा करूनही अधिकारी बेकायदेशीर पाणी उपशाकडे दुर्लक्ष करीत असल्याने मालगावचे माजी सरपंच प्रदीप सावंत व सदस्य राजू भानुसे यांच्यासह शेतकऱ्यांनी सोमवार, दि. ४ रोजी मालगाव बंदचा व पंढरपूर रस्ता रोकोचा इशारा दिला होता. तहसीलदार, ग्रामीण पोलीस ठाणे व म्हैसाळ योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसे निवेदनही दिले होते. याची दक्षता घेऊन कळंबी शाखा कालव्याचे अधिकारी निकम हे मालगाव ग्रामपंचायतीत आले असता शेतकऱ्यांनी त्यांना घेराओ घालून धारेवर धरले. पैसे घेऊन एका शेतकऱ्याला अनेकवेळा पाणी देता, त्यामुळे आम्हाला योजनेचे पाणी मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला. अधिकारी निकम यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला असता, शेतकरी संतप्त झाले. पाणी जोपर्यंत मिळत नाही, तो तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालयातून सोडणार नाही, प्रसंगी डांबून ठेवण्याच्या निर्णयापर्यंतही टोकाची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत या अधिकाऱ्यांकडून पाणी सोडण्याबाबत कोणतीच उपाय योजना होत नसल्याने माजी सरपंच प्रदीप सावंत, सरपंच महावीर रुकडे व सदस्य राजू भानुसे यांच्यासह शंभरहून अधिक शेतकरी भर उन्हात रस्त्यावर उतरले व त्यांनी मालगाव-खंडेराजुरी रस्ता रोखून धरला. आंदोलनाच्या एक दिवस अगोदरच शेतकऱ्यांनी रास्ता रोको केल्याने मिरज ग्रामीण पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी अचानकपणे घेतलेल्या आंदोलनाला हरकत घेतली. मात्र शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन पोलिसांनीच अधिकारी निकम व शेतकऱ्यांत मध्यस्थी केली.त्यानंतर कळंबी शाखा कालव्यावरील होणारा बेकायदेशीर पाणी उपसा रोखून वंचित शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्याच्या हालचाली सुरूकरण्यात आल्या. (वार्ताहर)