किरणच्या अपघाती मृत्यूने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

By Admin | Updated: November 22, 2015 00:02 IST2015-11-21T23:34:41+5:302015-11-22T00:02:43+5:30

दोन चिमुरडी पोरकी : विठ्ठलवाडीत अंत्यसंस्कार

Grief Mountain on the Family | किरणच्या अपघाती मृत्यूने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

किरणच्या अपघाती मृत्यूने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील विठ्ठलवाडी-तुळसण येथील चव्हाण कुटुंबीय सुरुवातीपासूनच अध्यात्मिक़ गावातील प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात या कुटुंबाचा सक्रिय सहभाग असायचा. दोन दिवसांपूर्वीही किरण हा त्याची आई व बहिणीसमवेत कार्तिक वारीसाठी पंढरपूरला गेला; मात्र त्याचठिकाणी शुक्रवारी रात्री त्याचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेमुळे चव्हाण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
विठ्ठलवाडी हे किरणचे मूळगाव. आई बाळाबाई, भाऊ धनाजी, वहिनी हर्षलता, बहीण अश्विनी, पत्नी सोनाली तसेच एक वर्षाची मुलगी व तीन महिन्यांची मुलगा असा किरणचा परिवार. आई बाळाबाई या धार्मिक कार्यक्रमात सहभागी असायच्या. त्याचबरोबर इतर कुटुंबीयांनाही अध्यात्माची ओढ होती.
चार दिवसांपूर्वी या कुटुंबाने कार्तिक वारीसाठी पंढरपूरला जाण्याचे नियोजन केले. विठ्ठलवाडीतून किरण त्याची आई व बहीण तसेच इतर गावांहून त्यांचे पाहुणे कार्तिक वारीला येणार होते. त्यासाठी या कुटुंबीयांनी खासगी जीपही ठरवली. गुरुवारी सकाळी सर्वजण विठ्ठलवाडीतून पंढरपूरला मार्गस्थ झाले.
गुरुवारी दुपारी त्याठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांनी विश्रांती घेतली. शुक्रवारी सकाळी त्यांनी देवदर्शन घेतले. मंदिर परिसरातच त्यांनी राहण्यासाठी खोलीही भाडेतत्त्वावर घेतली होती. शुक्रवारी रात्री सर्वजण खोलीमध्ये असताना रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास किरण ‘फिरून येतो,’ असे सांगून रूममधून बाहेर पडला.
त्यानंतर तो रेल्वे रुळाकडे गेला. त्याठिकाणी तो कानात हेडफोन घालून मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होता, असे प्रत्यक्षदर्शींनी कुटुंबीयांना सांगितले. मोबाईलवर बोलत असताना त्याला रेल्वेचा आवाज आला नाही. परिणामी, रेल्वेच्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी सकाळी किरणचा मृतदेह गावी विठ्ठलवाडी येथे आणण्यात आला. त्याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे चव्हाण कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. (प्रतिनिधी)

Web Title: Grief Mountain on the Family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.