खोडवा व्यवस्थापनासाठी दहा कोटींची अनुदान योजना
By Admin | Updated: December 21, 2015 00:59 IST2015-12-20T22:38:56+5:302015-12-21T00:59:09+5:30
मदन भोसले : पुढील हंगामात उसाचे क्षेत्र घटण्याची शक्यता

खोडवा व्यवस्थापनासाठी दहा कोटींची अनुदान योजना
भुर्इंज : ‘किसन वीर, प्रतापगड व खंडाळा सहकारी साखर कारखान्याच्या पुढील गळीत हंगाम २०१६-१७ मध्ये गाळप क्षमतेएवढा १६ लाख टन ऊस उपलब्ध होण्यासाठी किसन वीर उद्योग समूहाने खोडवा, निडवा व्यवस्थापन व सुरू हंगामातील ऊस लागवडीसाठी ९ कोटी ९२ लाख ४५ हजारांची प्रोत्साहनपर अनुदान योजना चालू लागण हंगामात त्वरित सुरू करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला आहे,’ अशी माहिती अध्यक्ष मदन भोसले यांनी दिली.
या संदर्भात दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, यंदा सरासरीपेक्षा कमी झालेला पाऊस, परतीच्या पावसाने दिलेली ओढ, धरणामध्ये सध्या असलेला कमी पाणीसाठा आणि त्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे तीनही कारखान्यांमध्ये गळीत हंगाम २०१६-१७ मध्ये गाळपासाठी उसाची उपलब्धता कमालीची घटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. किसन वीर उद्योग समूह व कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे मोठे आव्हान आहे. त्यावर मात करून पुढील गळीत हंगामात १६ लाख टन ऊस उपलब्ध होण्यासाठी कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात तुटणाऱ्या उसाचा खोडवा, निडवा ठेवण्यासाठी, सुरू हंगामात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊस लागवड करावी, यासाठी अनुदान स्वरूपात प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
मदन भोसले म्हणाले, ‘कारखाना कार्यक्षेत्रातील २० हजार ७५० एकरातील खोडवा-निडवा व्यवस्थापनाचे कारखान्याने
उद्दिष्ट ठेवलेले असून, त्यासाठी ८ कोटी ४२ लाख ४५ हजारांची गुंतवणूक अनुदानापोटी करण्यात येणार आहे. (वार्ताहर)
शेतकऱ्यांनी खोडवा ठेवावा
कारखाना कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासदांनी यंदाच्या हंगामात तुटलेल्या उसाचा खोडवा-निडवा ठेवावा. खोडवा व्यवस्थापनासाठी आणि सुरू हंगामात ऊस लागवडीसाठी कारखान्याने जाहीर केलेल्या योजनेचा-अनुदानाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी कारखान्याच्या ऊस विकास विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन मदन भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, कार्यकारी संचालक एन. बी. पाटील यांनी केले आहे.