बावड्यात साकारतेय भव्य क्रीडा संकुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:38 IST2021-02-10T04:38:24+5:302021-02-10T04:38:24+5:30
खंडाळा : खेळामुळे आरोग्य सुधारते. पण आधुनिक काळात खेळण्यासाठी मैदानांची कमतरता भासत आहे. शहरी भागात विशेष सुविधा असलेल्या क्रीडांगणांची ...

बावड्यात साकारतेय भव्य क्रीडा संकुल
खंडाळा : खेळामुळे आरोग्य सुधारते. पण आधुनिक काळात खेळण्यासाठी मैदानांची कमतरता भासत आहे. शहरी भागात विशेष सुविधा असलेल्या क्रीडांगणांची वानवा नाही; परंतु ग्रामीण भागात अशी क्रीडांगणे दिसून येत नाहीत. ग्रामीण खेळाडूंना खेळाच्या योग्य प्रशिक्षणासाठी सुसज्ज क्रीडा संकुल उभे करण्यासाठी बावडा ग्रामपंचायतीचे काम सुरू आहे. त्यामुळे हे भव्य क्रीडा संकुल खेळाडूंना संजीवनी ठरेल. ग्रामीण भागात साकारणारे हे पहिलेच क्रीडा संकुल असल्याने याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.
बावडा (ता. खंडाळा) येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भव्य क्रीडा संकुल उभारण्यात येत आहे. या कामाची पाहणी जिल्हा परिषद सदस्य मनोज पवार यांनी केली. यावेळी मिटकॉनचे व्यवस्थापक प्रदीप बावडेकर, महेश राऊत, चंद्रकांत पवार, मयूर भोसले यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
बावडा येथील क्रीडा संकुलात क्रिकेट, व्हाॅलिबाॅल, फुटबॉल मैदान, बॅडमिंटन कोर्ट, धावण्यासाठी ट्रॅक तसेच थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक, उंच उडी, लांब उडी यासह अन्य वैयक्तिक खेळांच्या सरावासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. मैदानी खेळाबरोबरच इनडोअर खेळाचीही व्यवस्था होणार आहे. याशिवाय कार्यालय, चेंजिंग रूम, प्रशिक्षक रुम, साहित्य खोलीसह इतर खोल्या तयार करण्यात येतील. त्यामुळे सुसज्ज मैदान उभे राहील.
(कोट)
खंडाळा तालुक्यात अनेक नवोदित खेळाडू क्रीडा क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रयत्नशील आहेत; परंतु त्यांच्या वैयक्तिक अथवा सांघिक खेळाचा सराव होण्यासाठी तालुका पातळीवर कुठेही सर्व सोयीयुक्त मैदान उपलब्ध नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी बावडा ग्रामपंचायतीने क्रीडांगण उभारणीचे काम हाती घेतले आहे. अल्पावधित हे काम पूर्ण होऊन एक सुसज्ज क्रीडांगण उपलब्ध होईल.
- मनोज पवार, जिल्हा परिषद सदस्य
फोटो : ०९ खंडाळा क्रीडा संकुल
बावडा येथे उभारण्यात येत असलेल्या क्रीडा संकुलाची जिल्हा परिषद सदस्य मनोज पवार यांनी पाहणी केली. (छाया : दशरथ ननावरे)