साथ उद्रेक होऊ नये यासाठी ग्रामपंचायतींनी उपाययोजना कराव्यात : विनय गौडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:40 IST2021-04-01T04:40:31+5:302021-04-01T04:40:31+5:30
सातारा : जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात जलजन्य आजारांचा उद्रेक होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींनी सार्वजनिक पाणीपुरवठा करताना टाकी स्वच्छता, पाणी ...

साथ उद्रेक होऊ नये यासाठी ग्रामपंचायतींनी उपाययोजना कराव्यात : विनय गौडा
सातारा : जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात जलजन्य आजारांचा उद्रेक होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींनी सार्वजनिक पाणीपुरवठा करताना टाकी स्वच्छता, पाणी शुद्धीकरण करून इतर उपाययोजनाही राबवाव्यात, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय गौडा यांनी केले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा म्हणाले, जिल्ह्यात २०२१मध्ये जलजन्य आजारांच्या साथीचा उद्रेक झाला आहे. याविषयीची माहिती घेतल्यावर असे लक्षात आले की, हा उद्रेक मुख्य जलवाहिनीला गळती, खासगी नळ कनेक्शन गळती, तुंबलेली गटारे आणि गटारातून जलवाहिनी जाणे तसेच टाकी व विहिरीची अस्वच्छता, पाण्याचे शुद्धीकरण न होणे यामुळे झालेला आहे. गतवर्षाची तुलना करता २०२१मध्ये सुरुवातीपासूनच जलजन्य आजाराच्या साथीचा उद्रेक होऊन मोठ्या प्रमाणात लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यापुढे अशी स्थिती राहिल्यास पुढील नऊ महिन्यांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात साथ उद्रेक होण्याची भीती आहे. पुढील संभाव्य धोका टाळण्यासाठी ग्रामपंचायतींनी उपाययोजना तत्काळ राबवाव्यात. त्यामुळे संभाव्य धोका टळण्यास मदत होईल.
ग्रामपंचायतींमार्फत दैनंदिन पाणीपुरवठा हा नियमित शुद्धीकरण करूनच व पुरेशा प्रमाणात करावा. पाणी उद्भव व पाण्याच्या टाक्यांच्या परिसरात ५० फुटापर्यंत शौचालय, जनावराचा गोठा तसेच सांडपाण्याचा निचरा असता कामा नये. पाणी उद्भवाशेजारी पाणी साठून राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच कपडे आणि जनावरे धुणे टाळणे गरजेचे आहे. नळ योजनेला कोठेही गळती असता कामा नये. याबाबत वारंवार पाहणी करावी. शुद्धीकरणानंतर अर्ध्या तासाने पाण्याचे वितरण करावे. शुद्धीकरणानंतर पाण्याची गुणवत्ता (ओटी टेस्ट) टाकीजवळ, प्रत्येक एंड पाईपच्या ठिकाणी असणाऱ्या शेवटच्या नळाची घेऊन त्याची नोंद ठेवावी. तीन महिने पुरेल एवढा टीसीएल साठा करून ठेवावा. तीन महिन्यांतून एकदा सार्वजनिक हातपंपांचे शुद्धीकरण करावे. सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे उद्भवाचे नमुने तीन महिन्यांतून एकदा तपासणीसाठी पाठवावेत. यासाठी ग्रामपंचायतींनी स्पीकरद्वारे लोकांमध्ये जागृती करावी, असेही गौडा यांनी सांगितले.
.........................................................................