ग्रामपंचायतीने करामध्ये ५० टक्के सवलतीबाबत ठराव करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:24 IST2021-07-22T04:24:29+5:302021-07-22T04:24:29+5:30
कराड : कोरोना महामारी संकटामुळे गेली २ वर्षं नांदगावमधील व्यापारी, कामगार, शेतकरी, शेतमजूरसह सर्वसामान्य माणूस बेजार झाला आहे. अनेकांच्या ...

ग्रामपंचायतीने करामध्ये ५० टक्के सवलतीबाबत ठराव करावा
कराड :
कोरोना महामारी संकटामुळे गेली २ वर्षं नांदगावमधील व्यापारी, कामगार, शेतकरी, शेतमजूरसह सर्वसामान्य माणूस बेजार झाला आहे. अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. काहींचे उत्पन्नाचे स्त्रोत बंद झाले आहेत, तर काहींचे उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे त्यांना शासकीय कर भरणे अवघड बनले आहे. या सर्वांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ग्रामस्थांना ग्रामपंचायतीने करामध्ये ५० टक्के सवलत देण्याबाबत ठराव करावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे यांनी निवेदनाद्वारे ग्रामपंचायतीकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारी संकटामुळे शासनानेही मोफत लस, मोफत भोजन थाळी, मोफत धान्य, मोफत कोरोना उपचार अशा विविध माध्यमांतून जनतेला दिलासा दिला आहे. तसेच समाजातील अनेक सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्तींनीही गरजूंना मदतीचा हात दिला आहे.
त्याच पद्धतीने ग्रामपंचायतीनेही आपली जबाबदारी म्हणून ग्रामस्थांना करांमध्ये ५० टक्के सवलत देण्यासाठी प्रयत्न करावा. कराड नगरपालिका तसेच राज्यातील अनेक ग्रामपंचायतींनी तसे ठराव करून शासनाकडे पाठवले आहेत. आपणही तसा ठराव करून वरिष्ठ पातळीवर पाठवावा. त्यासाठी पाठपुरावा करावा व ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
ग्रामसेवक मोहन शेळके यांच्याकडे याबाबतचे निवेदन प्रशांत सुकरे यांनी दिले आहे. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य वसंत माटेकर, जयवंत मोहिते, संकेत माळी, रघुनाथ जाधव, नितीन आंबेकर उपस्थित होते.
निवेदनावर जगन्नाथ माळी, पांडुरंग पाटील, निलेश माळी, सतीश तांबवेकर, राजेंद्र हावरे, संपत उमरदंड, अक्षय पाटील, संजय जाधव, आनंदा पाटील, मारुती लोहार, पांडुरंग कुंभार, दीपक शेटके, रामचंद्र पाटील, संजय कुंभार, सोनाप्पा पाटील, संदीप पाटील, कुलदीप शिणगारे आदींच्या सह्या आहेत.