ग्रामपंचायतीचे टाळे तीन दिवसांनंतर तोडले

By Admin | Updated: August 26, 2014 21:48 IST2014-08-26T21:43:42+5:302014-08-26T21:48:52+5:30

कोरेगावातील आंदोलन : पदाधिकाऱ्यांसह प्रशासनावर कारवाईची मागणी

The gram panchayat lock broke after three days | ग्रामपंचायतीचे टाळे तीन दिवसांनंतर तोडले

ग्रामपंचायतीचे टाळे तीन दिवसांनंतर तोडले

कोरेगाव : मागासवर्गीय वस्तीकडे जाणारा पाणी पुरवठा बेकायदा मार्गाने अडविल्यावरुन शनिवारी सकाळी टाळे ठोकून बंद पाडण्यात आलेले ग्रामपंचायतीचे कामकाज मंगळवारी सकाळी सुरु झाले. ग्रामपंचायत सदस्य संजय पिसाळ यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेत कुलुपे तोडली आणि ग्रामपंचायत जनतेसाठी खुले केले.
दरम्यान, मागासवर्गीय जनतेवर पदाधिकाऱ्यांसह प्रशासनाने अन्याय करत आंदोलन चिरडले असून, त्यांच्यावर तातडीने कारवाई करा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य रमेश नाळे व विद्या मनोज येवले यांनी केली आहे.
वॉर्ड क्र. १ मधील नागरिक गणपत अंकुश बर्गे यांनी ग्रामपंचायत आपल्या विषयाकडे लक्ष देत नसल्याचे पाहून मागासवर्गीय वस्तीकडे जाणारा पाणी पुरवठा बंद पाडला होता. त्याच्या निषेधार्थ ग्रामपंचायत सदस्य रमेश नाळे व विद्या मनोज येवले यांच्यासह नागरिकांनी शनिवारी सकाळी ग्रामपंचायतीस टाळे ठोकले होते.
गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे, विस्तार अधिकारी (पंचायत) खाशाबा जाधव, सरपंच सुभद्रा शिंदे, उपसरपंच प्रतिभा बर्गे व ग्रामसेवक समाधान माने यांनी आंदोलनाकडे लक्ष दिले नाही. जनतेच्या सोईसाठी ग्रामपंचायत कार्यालय उघडण्याचा निर्णय घेतला, असे पिसाळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ग्रामपंचायतीने मागासवर्गीयांवर अन्याय केला असून, बळजबरीने आंदोलन चिरडले असल्याचा आरोप करत या विषयी सरपंच सुभद्रा शिंंदे, उपसरपंच प्रतिभा बर्गे व ग्रामसेवक समाधान माने यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी सदस्य रमेश नाळे, विद्या मनोज येवले यांच्यासह वॉर्ड क्र. १ मधील नागरिकांनी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे यांना निवेदन दिले. (प्रतिनिधी)

वादावादीनंतरही निर्णय नाही
गेले दोन दिवस ग्रामपंचायत बंद असल्याने जनतेची कामे रखडली होती, त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांबरोबरच ग्रामपंचायत सदस्य संजय पिसाळ यांनी मंगळवारी सकाळी कुलूपे तोडली आणि ग्रामपंचायत कार्यालय उघडले. त्यानंतर वॉर्ड क्र. १ मधील सदस्य व आंदोलनकर्ते ग्रामपंचायतीत दाखल झाले. यावेळी जोरदार वादावादी झाली.

Web Title: The gram panchayat lock broke after three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.