ग्रामपंचायत निवडणुकीत २९३ अर्ज अवैध

By Admin | Updated: July 22, 2015 00:34 IST2015-07-22T00:32:39+5:302015-07-22T00:34:34+5:30

रंगत वाढली : ७११ ग्रामपंचायतींच्या रिंगणात उरले १६ हजार ८४३ अर्ज

In the Gram Panchayat elections, 293 applications are invalid | ग्रामपंचायत निवडणुकीत २९३ अर्ज अवैध

ग्रामपंचायत निवडणुकीत २९३ अर्ज अवैध

सातारा/कऱ्हाड : जिल्ह्यातील ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या १७ हजार १५५ पैकी २९३ अर्ज अवैध ठरले. निवडणूक रिंगणात १६ हजार ८४३ इतके अर्ज राहिल्याने निवडणुकीतील रंगत वाढली आहे.
मोजक्या ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाल्यात जमा असली तरी उद्या, गुरुवारी अर्ज माघारीनंतर नेमके चित्र स्पष्ट होणार आहे. सातारा तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींसाठी ८५६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. काही काळ तणाव निर्माण झाला. तेथील आरक्षित जागांवरील दोन उमेदवारांकडे जातपडताळणी प्रमाणपत्र नव्हते. दरम्यान, अर्ज भरतेवेळी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे छाननी प्रक्रियेवेळी जातपडताळणीसाठी अर्ज केल्याची पावती जोडण्याची परवानगी मागितली होती. संबंधित उमेदवारांनी वेगाने हालचाली करून मंगळवारी पहाटे कोल्हापूर गाठले. पावती आणून जमा केली; परंतु विरोधकांनी आक्षेप घेतल्याने बराच काळ खल चालला होता. खेड, डोळेगाव, वेचले या ग्रामपंचायतींसाठी रंगतदार लढती पाहायला मिळणार आहेत.
दरम्यान, पाटण तालुक्यातील १६४४ अर्जांपैकी २३ अर्ज बाद ठरल्याने १६२१ अर्ज उरले आहेत. वाई तालुक्यातील ११५३ अर्जांपैकी १७ अर्ज बाद ठरले. ११३६ उमेदवारी अर्ज उरले आहेत. खंडाळा तालुक्यातून १५९२ अर्जांपैकी १९ अर्ज बाद ठरल्याने १५७३ अर्ज उरले आहेत. माण तालुक्यातून १५७९ अर्जांपैकी १५ अर्ज बाद ठरले असून, १५६४ अर्ज उरले आहेत.
कऱ्हाडात ३५ अर्ज अवैध
तालुक्यातील ९८ ग्रामपंचायतींच्या ९५३ जागांसाठी चुरशीने एकूण ३ हजार ४२१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. मंगळवारी, २१ रोजी ३ हजार ४२६ उमेदवारांपैकी ३ हजार ३९२ उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले, तर ३५ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. बहुतांश गावांत दुरंगी, तर काही गावांत तिरंगी लढत होणार आहे. कऱ्हाड उत्तरमधून २९ तर कऱ्हाड दक्षिणमधून ६९ अशा ९८ ग्र्रामपंचायतींचा समावेश आहे.
येथील शासकीय धान्य गोदामात मंगळवारी सकाळी निवडणूक निरीक्षक उत्तम पाटील, निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार राजेंद्र शेळके, निवासी नायब तहसीलदार बी. एम. गायकवाड, नायब तहसीलदार मीनल भामरे-भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एक निवडणूक अधिकारी व दोन सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्जांची छाननी केली.
दरम्यान, छाननीत २६ ग्रामपंचायतीतून ३५ अर्ज अवैध ठरविण्यात आले. दरम्यान, साळशिरंबे येथील सुधीर चोपडे यांचा अर्ज कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी तसाच होता. काही कालावधीनंतर चोपडे यांनी कागदपत्रांची पूर्तता करत पूर्ततेचा दाखला अधिकाऱ्यांना आणून दिला; पण त्यांनी तो स्वीकारला नसल्याने हा अर्ज वैध ठरविण्यात यावा, अशी मागणी उमेदवार सुधीर चोपडे यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. (प्रतिनिधी)
कोरेगावात चार अर्ज अवैध
कोरेगाव : तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक आणि एका ग्रामपंचायतीच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी १०५८ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीत चार अर्ज अवैध ठरविण्यात आले. त्यामुळे आता १०५४ अर्ज शिल्लक राहिले आहेत, अशी माहिती तहसीलदार रवींद्र रांजणे यांनी दिली. नलवडेवाडी (बिचुकले) व सोळशी येथील प्रत्येकी दोन अर्ज असे एकूण चार अर्ज अवैध ठरले.
फलटण तालुक्यातील ४५ अर्ज बाद
फलटण : तालुक्यातील ७८ ग्रामपंचायतींसाठी २ हजार ६९४ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ४५ अर्ज बाद झाले. ७०० जागांसाठी आता २ हजार ५६९ उमेदवारी अर्ज उरले आहेत.
खटावातील ५ ग्रामपंचायती बिनविरोध
वडूज : खटाव तालुक्यात अंभेरी, कातळगेवाडी, बोंबाळे या गावांसह एकूण ५ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध होणार आहे. ८८ ग्रामपंचायतींसाठी दाखल २ हजार २४४ अर्जांपैकी ३५ अर्ज बाद ठरल्याने निवडणूक रिंगणात २ हजार २०९ अर्ज उरले आहेत.
जावळीत ५० टक्के ग्रामपंचायती बिनविरोध
मेढा : जावळी तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींपैकी २९ ग्रामपंचायतींची वाटचाल बिनविरोधच्या दिशेने सुरू आहे. आमदार शशिकांत शिंदे यांच्या हुमगाव ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी ११ अर्ज दाखल असून, ही निवडणूकही बिनविरोध होण्याची शक्यता आहे. दरम्यान, एकूण ७४९ अर्जांपैकी सर्वाधिक ८६ अर्ज छाननीत बाद झाले.

Web Title: In the Gram Panchayat elections, 293 applications are invalid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.