ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांचा पाऊस!

By Admin | Updated: July 16, 2015 21:29 IST2015-07-16T21:29:02+5:302015-07-16T21:29:02+5:30

१,८४० अर्ज दाखल : अमावस्या संपताच तहसील कचेऱ्यांत गर्दी

Gram panchayat election candidates rain for the candidature! | ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांचा पाऊस!

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांचा पाऊस!

सातारा : जिल्ह्यातील ७११ सार्वत्रिक आणि १५ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय परिस्थिती चांगलीच ढवळून निघाली आहे. बुधवारी सकाळी सुरू झालेली अमावस्या गुरुवारी सकाळी संपल्यानंतर या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग वेगाने सुरू झाली. गुरुवारी एका दिवसात विक्रमी १,८४० उमेदवारी अर्ज जिल्हाभरात दाखल झाले. राजकीय क्षेत्रात मुहूर्ताला मोठे महत्त्व आहे. अमावस्येला उमेदवारी अर्ज भरल्यास ते अडचणीचे ठरू शकते, असा सार्वत्रिक समज आहे. किंबहुना राजकीय क्षेत्रात हा समज जास्त असल्याचे ग्रामपंचायत निवडणुकीवरून समोर आले. गुरुवारी अमावस्या संपली आणि गावागावांतील गटातटाची मंडळी गुरुवारी मोठ्या संख्येने तालुक्याच्या गावांत जाऊन धडकली. कऱ्हाड तालुक्यात सर्वाधिक ५०५ उमेदवारी अर्ज दाखल झाले. गुरुवारअखेर जिल्हाभरात २ हजार ८६८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. २० जुलैअखेर आणखी उमेदवारी अर्ज दाखल होणार असल्याने राजकीय रंगत वाढली आहे. गुरुवारी तालुकानिहाय दाखल झालेल्या अर्जांची आकडेवारी अशी : फलटण : २१८, जावळी : १०३, सातारा : ६८, कोरेगाव : १२६, कऱ्हाड : ५०५, पाटण : २०१, वाई : १०७, महाबळेश्वर : ४६, खंडाळा : ११२, खटाव : ११३, माण : १३६, एकूण : १,८४०.
जिल्ह्याच्या पारांवर राजकीय चर्चांना ऊत आला आहे. (प्रतिनिधी)

निवडणूक याद्यांनी घरे फोडली
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तयार असलेल्या मतदार याद्यांमध्ये फारच मजेशीर प्रकार पाहायला मिळत आहेत. एकाच घरातील मते वेगवेगळ्या ठिकाणी फुटली आहेत. विशेष म्हणजे, पतीचे नाव जर वॉर्ड १ मध्ये असेल, तर पत्नीचे नाव वॉर्ड २ मध्ये घातले गेले आहे. अनेक मृत लोकांची नावेही मतदार यादीत आलेली आहेत. सदोष मतदार याद्यांमुळे उमेदवारांमध्ये मोठी संभ्रमावस्था आहे.

Web Title: Gram panchayat election candidates rain for the candidature!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.