ग्रामपंचायत प्रशासनाने केलं गाव कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:41 IST2021-05-11T04:41:10+5:302021-05-11T04:41:10+5:30
पाचगणी : सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या संसर्गाला गावच्या वेशीवरच रोखण्याकरिता कोरोना योद्धा म्हणून भौसे ग्रामपंचायतीचे ...

ग्रामपंचायत प्रशासनाने केलं गाव कोरोनामुक्त
पाचगणी : सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या संसर्गाला गावच्या वेशीवरच रोखण्याकरिता कोरोना योद्धा म्हणून भौसे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आर. व्ही. चव्हाण यांनी आपल्या अखत्यारित असणाऱ्या चार गावांमधील कोरोना संसर्ग रोखण्यात यश मिळवले आहे. गावातील कोरोना योद्ध्यांच्या सहकार्याने वाटचाल केल्याने महाबळेश्वर तालुक्यातील पांगारी, चतुरबेट, भौसे ही गावे कोरोनामुक्त झाली आहेत.
गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग सुरु झाला आणि पाहता-पाहता गावेच्या गावे कोरोना संसर्गाने बाधित झाली. लोकं भयभीत झाली. त्यातच गोडवली हे कोरोनाचा हॉटस्पॉट बनले होते. प्रशासनाने गतवर्षी तात्पुरता अतिरिक्त कार्यभार ग्रामसेवक आर. व्ही. चव्हाण यांच्याकडे दिला होता. परंतु, महाबळेश्वर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण घोलप, तहसीलदार सुषमा पाटील तसेच विस्तार अधिकारी सुनील पार्टे यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार चव्हाण यांनी गोडवलीतील कोरोना हद्दपार करण्यास योगदान दिले. तर चतुरबेट आणि घोणसपूर गावांमध्ये कोरोनाला गावात येण्यापासून रोखले.
यावर्षी मात्र अचानक कोरोनाची दुसरी लाट आली. यामध्ये बघता-बघता भौसेत २८, पांगारीत २२, चतुरबेटमध्ये ६, घोणसपूरमध्ये १२ बाधित सापडल्याने ग्राम समितीची बैठक घेत कडक निर्बंध लावले गेले. त्याकरिता सर्व कोरोना योद्ध्यांच्या सहकार्याने ग्रामस्थांमध्ये प्रथमतः जनजागृती केली गेली. जीवनावश्यक वस्तू घरपोच करून गावातील कोणीही व्यक्ती बाहेर जाणार नाही, याची दक्षता घेतली. त्याचा परिणाम चांगला दिसून आला. त्यामुळे गावात होणारा कोरोना संसर्ग रोखला गेला. याकरिता या गावातील आशा स्वयंसेविकांनी जीव तोडून काम केले. त्यामुळेच चारही गावे कोरोनामुक्त राहिली. पुन्हा संसर्ग होऊ नये, याकरिता सर्वांना लसीकरण करण्याकरिता गावं पातळीवर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.
चौकट :
महाबळेश्वर तालुक्यात प्रशासकीय कोरोना योद्धे आणि ग्रामस्थ राबवत असलेल्या उपाययोजनांमुळे गावे कोरोनामुक्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत आहेत.
प्रतिक्रिया :
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्याकरिता प्रथम ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली. त्याचे संभाव्य धोके निदर्शनास आणून दिल्याने ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने घरात राहण्याचा निर्णय घेतला. त्यांना अत्यावश्यक असणाऱ्या सेवा पुरविण्यास प्राधान्यक्रम देत कोरोना योद्ध्यांमार्फत सेवा पुरवल्या. त्यामुळे ही गावे कोविडमुक्त झाली आहेत.
- आर. व्ही. चव्हाण
ग्रामपंचायत भौसे, महाबळेश्वर
फोटो १०पाचगणी-भोसे
पांगारी (ता. महाबळेश्वर) येथे कोरोना संसर्ग रोखण्याकरिता प्रतिबंधक उपाययोजना कोरोना योद्धे करत आहेत. (छाया : दिलीप पाडळे)