पदवीधर बनले एसटीचे सारथी!
By Admin | Updated: November 1, 2015 23:41 IST2015-11-01T23:41:29+5:302015-11-01T23:41:29+5:30
उच्च शिक्षित बसचालकांची संख्या वाढली : राज्य परिवहन महामंडळच्या सातारा विभागात नव्याने १७० चालक रुजू

पदवीधर बनले एसटीचे सारथी!
जगदीश कोष्टी ल्ल सातारा
एसटीतून प्रवास करत असताना चालकाशी होणारा वाद प्रवाशांना नवीन नाही. प्रवासीही अनेकदा निमूटपणे सहन करतात, त्यांना काही विचारलं तर, ‘यांच्या नादाला कोणी लागायचं. कमी शिक्षणामुळे कोणाशी कसं बोलायचं याची समज आलेली नसते,’ असं सांगितलं जातं; पण हा समज इतिहासजमा होण्यास आता वेळ लागणार नाही. एसटीच्या ताफ्यात पदवीधर युवक चालकपदी रुजू होत आहेत.
कमी शिक्षणामुळे अनेकदा तरुणांसमोर चांगल्या नोकरीची संधी मिळत नाही. अशावेळी खासगी वाहनांवर चालक म्हणून काम केले जाते. रात्रंदिवस चालक म्हणून काम केले जात असल्याने त्यांची भाषा, कपडेही तसेच असतात. रात्री जागरण केल्यामुळे त्यांच्यात उत्साह फारसा जाणवत नाही.
खासगी वाहनावर काम करत असतानाच काही चालक एसटी महामंडळात संधी मिळते का याची वाट पाहतात. अनुभवाच्या जोरावर त्यांना नोकरीही मिळते. मात्र, मानसिकता, वर्तन यात फारसा फरक पडत नाही. त्यातूनच प्रवाशांशी हुज्जत घातली जाते. त्यामुळे अनेक प्रवासी खासगी वाहतुकीकडे वळत आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागासाठी चालक भरतीसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यातून गुणवत्तेनुसार भोसरी, येथील मध्यवर्ती चालक चाचणी केंद्रात संगणकावर एसटी चालविण्याची चाचणी घेण्यात आली. लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेतील गुणांच्या आधाराने पात्र चालकांना कागदपत्रे पडताळणीसाठी सातारा विभागात बोलाविण्यात आले होते.
यशस्वी उमेदवारांमधून १७० उमेदवारांची चालक म्हणून निवडले. दिवाळी सण उत्पन्नाचा हंगाम असल्याने विभाग नियंत्रक धनाजी थोरात यांनी चार गाड्या आठ निरीक्षक उपलब्ध करून प्रत्येक चालकाचे ४८ दिवसांचे एसटी विभागाअंतर्गत प्रशिक्षण दिले.
विभाग नियंत्रण धनाजी थोरात यांनी दिलेल्या सूचनांनुसार पात्र उमेदवारांना एसटीतर्फे विनाथांबा प्रशिक्षण दिले आहे. यामध्ये नवरात्र, दसरा सणालाही सुटी घेतलेली नाही.
११ नोव्हेंबरपासून आमची टीम झटत आहे.
- दत्तात्रय गोरे
वाहतूक निरीक्षक प्रशिक्षण
एसटीत भरती होऊन चालक होण्याचे स्वप्न लहानपणापासून पाहिले होते. २०१२ च्या भरतीत प्रयत्न केला. पण त्यावेळी परवाना नवीन असल्याने यश आले नाही. त्यामुळे नाराज न होता ट्रकवरच काम केले. त्यामुळे यंदाची भरती अवघड गेली नाही.
- महेश जाधव, उंब्रज, प्रशिक्षक
वाहन चालविण्याचा दहा वर्षांचा अनुभव असून, पीएमटीमध्ये दीड वर्षे चालक म्हणून काम केले. सातारा विभागात भरती निघाल्याने येथे प्रयत्न केला. मी कला शाखेतून पदवीचे शिक्षण घेतले आहे. नियोजनाप्रमाणेच पारदर्शकपणेच काम झाले आहे. त्यामुळे एसटीत भरती झाल्याचे समाधान वाटत आहे.
- उमेश शिंगणे,
लिंब, गोवे सातारा, प्रशिक्षक