ग्रेड सेपरेटरची बत्ती गुल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:16 IST2021-02-05T09:16:37+5:302021-02-05T09:16:37+5:30
सातारा : साताऱ्यातील बहुचर्चित ग्रेड सेपरेटरमधील (भुयारी मार्ग) वीजपुरवठा बुधवारी दिवसभर खंडित झाला. परिणामी वाहनधारकांना हेडलाईट लावून प्रवास करावा ...

ग्रेड सेपरेटरची बत्ती गुल !
सातारा : साताऱ्यातील बहुचर्चित ग्रेड सेपरेटरमधील (भुयारी मार्ग) वीजपुरवठा बुधवारी दिवसभर खंडित झाला. परिणामी वाहनधारकांना हेडलाईट लावून प्रवास करावा लागला. भुयारी मार्गात काळोख पसरल्याने वाहनधारकांना भरदिवसा रात्रीचा अनुभव आला.
आठ रस्ते एकत्र जोडणाऱ्या पोवई नाक्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पोवई नाका येथे ग्रेड सेपरेटरची उभारणी करण्यात आली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी ग्रेड सेपरेटरचे अचानक उद्घाटन करून सर्वांनाच धक्का दिला. यानंतर दि. २९ जानेवारी रोजी ग्रेड सेपरेटरचे शासकीय उद्घाटन करण्यात आले. ग्रेड सेपरेटर वाहतुकीसाठी खुला झाल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटला असला तरी, आता हळूहळू समस्या तोंड वर काढू लागल्या आहेत.
ग्रेड सेपरेटरमधील वीज पुरवठा दिवस-रात्र सुरू असतो. त्यामुळे वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होत नाही. मात्र, बुधवारी शाहू बोर्डिंग ते तहसील कार्यालय मार्गावरील वीज पुरवठा सकाळपासून खंडित झाला होता. भुयारी मार्गात काळोख पसरल्याने वाहनधारकांना हेडलाईट लावून प्रवास करावा लागला.
(कोट)
बाहेरगावाहून येणाऱ्या अनेक वाहनधारकांना कुठून व कसे जावे याची कल्पना नसल्याने, ते भुयारी मार्गातून विरुद्ध दिशेने प्रवास करतात, ही बाब धोकादायक आहे. वाहतूक पोलिसांनी सुरक्षिततेसाठी याठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे गरजेचे आहे.
- गणेश दुबळे, अध्यक्ष,
रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन
फोटो : ०३ ग्रेड सेपरेटर
साताऱ्यातील ग्रेड सेपरेटरमधील वीज पुरवठा बुधवारी दिवसभर खंडित झाल्याने भुयारी मार्गात काळोख पसरला होता.