ग्रामपंचायतींसह शाळा होणार ‘आयएसओ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2015 00:20 IST2015-07-05T22:49:48+5:302015-07-06T00:20:06+5:30
कोरेगाव तालुका : २५ शाळांचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने पंचायत समितीचे पावले

ग्रामपंचायतींसह शाळा होणार ‘आयएसओ’
कोरेगाव : कोरेगाव विकास गटातील ग्रामपंचायत, शाळांना ‘आयएसओ २००१’ मानांकन मिळावे, यादृष्टीने पंचायत समितीच्या पातळीवरून नियोजन करण्यात येत असून, त्यादृष्टीने शैक्षणिक व भौतिक सुविधांचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पंचायत समितीतर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोरेगाव विकास गटातील शाळा, ग्रामपंचायतींना ‘आयएसओ’ मानांकन मिळाल्यास ग्रामपंचायतीकडील सर्वच योजनांची अंमलबजावणी, देण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा, दैनंदिन कामकाज, गावांतर्गत स्वच्छता, सर्व कार्यालयाची स्वच्छता यामध्ये गुणवत्ता व सातत्य राखणे शक्य होणार आहे.
कोरेगाव विकास गटातील ग्रामपंचायतींनी यापूर्वी पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना, निर्मल ग्राम योजना, महाराष्ट्र सुवर्णमहोत्सवी ग्रामीण दलित वस्ती सुधार वस्ती, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, करवसुली, स्वच्छ भारत अभियान, संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान आदी योजनेमध्ये कामकाज करून तालुक्याचा नावलौकिक वाढविला आहे. जास्तीत जास्त ग्रामपंचायत व शाळांना हे मानांकन प्राप्त करण्यासाठी लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेण्यात येणार आहे.
‘आयएसओ’ मानांकनांसाठी कोरेगाव पंचायत समितीत नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत संभाव्य ६२ गावांतील सरपंच, ग्रामसेवकांची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेसाठी परिजात संस्था औरंगाबादचे मुख्य व्यवस्थापक प्रसाद जोशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त करण्यासाठी ग्रामपंचायतींनी कोणकोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, याची माहिती देण्यात आली. त्याच दिवशी संस्थेचे मुख्य व्यवस्थापक प्रसाद जोशी यांनी त्रिपुटी व शिरंबे ग्रामपंचायतीस भेट देऊन केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
कार्यशाळेत सोनके, शिरंबे, भंडारमाची, गुजरवाडी ट., वाठार किरोली, जांब बुद्रुक, जरेवाडी, त्रिपुटी, चिमणगाव, वडाचीवाडी येथील सरपंचांनी कोणत्याही परिस्थितीत गावाचा दर्जा वाढविण्याचा संकल्प केला. अर्चना वाघमळे, प्रभारी गटविकास अधिकारी क्रांती बोराटे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष अभिजित चव्हाण, सचिव राहुल कदम, सदस्य विक्रम देशमुख यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात प्रथम कोरेगाव विकास गटातील २५ अंगणवाड्या २०१४-१५ मध्ये ‘आयएसओ २००१’ मानांकित झाल्या आहेत. आता २५ जिल्हा परिषद शाळांना हा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- संभाजी जंगम, गटशिक्षणाधिकारी