दहिवडी : ‘सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने अगोदर मराठा आरक्षणाविषयी आणि आता ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाविषयी न्यायालयात व्यवस्थित बाजू मांडली नाही. सगळे समाज अस्वस्थ झाले असताना हे सरकार फक्त लुटायचे धंदे करत आहे. मराठा समाजाचे तसेच ओबीसींचे राजकीय आरक्षण परत मिळाल्याशिवाय आम्ही या सरकारला झोपू देणार नाही. जिथे अपयश येईल तिथे केंद्राकडे बोट दाखविणाऱ्या ठाकरे सरकारला जनतेतून उठाव होऊन घरी बसावे लागेल,’ असा टोला आ. जयकुमार गोरे यांनी लगावला.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे रद्द झालेले ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पुन्हा देण्यात यावे, या मागणीसाठी शनिवारी दहिवडी येथील फलटण चौकात आ. जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली माण तालुका भाजप पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केले.
आंदोलनात भाजप तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, नगराध्यक्ष धनाजी जाधव, सिद्धार्थ गुंडगे, राजाराम बोराटे, लिंगराज साखरे, बाळासाहेब मासाळ, बाळासाहेब खाडे, काकासाहेब शिंदे, ॲड. दत्तात्रय हांगे, हरिभाऊ जगदाळे, दिगंबर राजगे, नवनाथ शिंगाडे, प्रताप भोसले, शिवाजी जगदाळे, महेश कदम, अब्दागिरे, अप्पासाहेब पुकळे, रवी काटकर, अजित दडस, सदाशिव सावंत आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. गोरे म्हणाले, ‘राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात १५ महिने एम्पेरिकल डाटा सादर न केल्यामुळेच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. सर्वोच्च न्यायालयानेच या सरकारच्या वेळकाढू धोरणाला फटकारले आहे. या सरकारची मराठा आणि ओबीसी समाजाप्रती संवेदना संपली आहे. जोपर्यंत ओबीसींचे राजकीय आणि मराठा समाजाचे आरक्षण मिळत नाही, मागासवर्गीय आयोग स्थापन होत नाही, तोपर्यंत या सरकारला आम्ही झोपू देणार नाही आणि मंत्र्यांना फिरू देणार नाही.’
(चौकट)
पोलिसांचा बंदोबस्त!
भाजपच्या आजच्या चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दहिवडी आणि परिसरात पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. सर्वच भाजप पदाधिकाऱ्यांना आदल्या दिवशीच नोटिसा दिल्या होत्या. म्हसवड, गोंदवले, मार्डी, पिंगळी फाटा, बिदालसह सर्वच बाजूंनी येणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेट्स लावून आंदोलनकर्त्यांना अडविण्यात येत होते. एकाही वाहनाला दहिवडीत प्रवेश दिला जात नव्हता. आंदोलनकर्ते दोन किलोमीटर पायी चालत चौकात पोहोचले. चक्काजाम आंदोलन तासभर चालल्यामुळे फलटण चौकात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
२६ दहिवडी
फोटो : दहिवडी (ता. माण) येथे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर आ. जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले.