सरकारी डॉक्टरांची ‘मोबाईल ओपीडी’--डॉक्टर, तुम्हीसुद्धा? :
By Admin | Updated: December 2, 2014 23:29 IST2014-12-02T22:14:18+5:302014-12-02T23:29:25+5:30
‘डायल १0८’ मुळे झाली अनेकांची गोची... ‘नैसर्गिक प्रसूती’ शक्यच नाही...

सरकारी डॉक्टरांची ‘मोबाईल ओपीडी’--डॉक्टर, तुम्हीसुद्धा? :
सातारा : जिल्ह्यातील बहुतांशी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि खासगी हॉस्पिटलशी असणारे ‘आर्थिक संबंध’ लपून राहिलेले नाहीत. काही वैद्यकीय अधिकारी तर शासकीय सेवेत कार्यरत राहूनच स्वत:ची ‘ओपडी’ मोबाईलवरून चालवत असल्याची चर्चा नेहमीच असते. शासकीय रुग्णालयात एखादा रुग्ण तपासत असतानाच अनेकदा ते मोबाईलवरून आपल्या खासगी रुग्णालयात आलेल्या रुग्णांना मार्गदर्शन करत असल्याचे अनेकांनी पाहिले आहे.
विशेष म्हणजे अनेक राजकीय तथा बिगर राजकीय संघटनांनी त्या अनुषंगाने अनेकदा आंदोलनेही केली आहेत. तरीही त्याकडे वैद्यकीय अधिकारी दुर्लक्ष करतात. काही शासकीय वैद्यकीय अधिकारी अनेक सुपरस्पेशालिटी तर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मानधनावर काम करतात. शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि खासगी डॉक्टर यांच्यातील परस्पर सांमजस्य असणारे लागेबांधे अनेकदा लपून राहत नाही. जिल्ह्यातील कोणत्याही शासकीय रुग्णालयात एखादा रुग्ण जरी दाखल झाला तरी वैद्यकीय अधिकारी नाक मुरडतच खासगीचा पर्याय देतात. कारण यापाठीमागे मोठे अर्थकारण दडलेले असते. एखादा रुग्ण दिलेल्या सल्ल्याप्रमाणे दाखल झाला तर सल्ला देणाऱ्याचे कमिशन ठरलेलेच असते. अनेकदा हे कमिशन तर हजारो अथवा लाखोंच्या घरात असते. (लोकमत टीम)
‘डायल १0८’ मुळे
झाली अनेकांची गोची...
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस (डायल १0८) ही रुग्णवाहिका सेवा मोफत सुरू केल्यामुळे अनेक शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांची गोची झाली. ही सेवा टोल फ्री आहे. त्यातच गर्भवती महिलांसाठी या माध्यमातून मोफत सेवा देण्यात येते. एखाद्या शासकीय रुग्णालयात जर रुग्ण दाखल झालाच तर त्याला घरी सोडायचे असेल अथवा येथून खासगी रुग्णालयात दाखल करावयाचे झाल्यास संबधित वैद्यकीय अधिकारी अमूकच रुग्णवाहिकेतून त्याला घरी न्या असा आग्रह धरायचे. यामध्येही कट-प्रॅक्टिस असल्याची चर्चा असायची. आता मात्र, ‘डायल १0८’ मुळे सारेच बंद झाले आहे.
आस्थापनामध्येच मेडिकल
डॉक्टरांची ‘कट प्रॅक्टिस’ प्रत्येकाच्या जगण्यात अडथळे निर्माण करू लागली आहे. रुग्णवाहिकेपासून ते औषधविक्री करणाऱ्यापर्यंत त्याचा फटका बसत आहे. अनेक सुपर स्पेशालिटी, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आस्थापनाच्यावतीनेच मेडिकल सेवा सुरू करण्यात आली आहे. परिणामी आजूबाजूला असणारे मेडिकल व्यावसायिक मेटाकुटीस आले आहेत. यावरही बंधने आणण्याची मागणी आता होऊ लागली आहे. अनेकदा सुपर स्पेशालिटी, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ‘वैद्यकीय प्रतिनिधी’ भेटी देण्यास आले असता डॉक्टरांना औषधांची सॅम्पल देऊन जातात. विशेष म्हणजे हीच सॅम्पल येथेच असणाऱ्या मेडिकलमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात येत असल्याची चर्चा असते.
‘नैसर्गिक प्रसूती’ शक्यच नाही...
गर्भवती महिला जर एखाद्या खासगी रुग्णालयात दाखल झाली आणि तिची प्रसूती नैसर्गिक होत असली तरी खासगी डॉक्टर ‘नैसर्गिक प्रसूती’ शक्यच नसल्याचे सांगतात. यामध्येही त्यांचा फायदा दडलेला असतो. ‘नैसर्गिक प्रसूती’ झाली तर तत्काळ डिसचार्ज मिळतो. मात्र, शस्त्रक्रिया झाली तर बारा ते पंधरा दिवस थांबावेच लागते. यामध्ये भूलतज्ज्ञ, कॉटचे भाडे, औषधांचा खर्च आणि बारा ते पंधरा दिवसा थांबावे लागल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची ये-जा असा जवळपास ४0 हजारांच्या पुढे खर्च जातो.