शासकीय कार्यालये पाण्यासाठी तहानली
By Admin | Updated: March 4, 2016 00:56 IST2016-03-03T22:55:49+5:302016-03-04T00:56:45+5:30
कोरेगाव : शेकडो लोकांसाठी वॉटर जारचा तात्पुरता पर्याय

शासकीय कार्यालये पाण्यासाठी तहानली
कोरेगाव : तालुक्याचे मुख्यालय असलेल्या कोरेगाव शहराच्या विविध भागांमध्ये शासकीय कार्यालये आहे. सध्या या कार्यालयांमध्ये तीव्र पाणी टंचाई भासू लागली आहे. पाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्याने अधिकारी केवळ वॉटर जारचा पर्याय काढू शकले आहेत, दररोज शेकडो लोक येणाऱ्या या कार्यालयांमध्ये १८ ते २० लिटर पाणी पुरणार तरी कसे ? असा सवाल उपस्थित होत आहे.
तहसील कार्यालयात केवळ एकच पाण्याची टाकी आहे. तेथे एक हजार लिटर पाण्याची सोय होऊ शकत नाही. त्याच आवारात दुय्यम निबंधक कार्यालय, उपकोषागार कार्यालय, नगर भूमापन अधिकारी कार्यालय, नागरी सुविधा केंद्र (सेतू) व पोलीस ठाणे आदी कार्यालये आहेत, तेथे पोलीस ठाण्याचा वॉटर कुलर असून, तेथे थंड पाणी असल्याने लोक पाण्यासाठी गर्दी करत आहेत.
दुपारी बाराच्या सुमारास या कुलरचे पाणी संपत असल्याने दुपारनंतर या भागात पाणी उपलब्ध होत नाही.
तालुका कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग, एकात्मिक बालविकास विभाग, शिक्षण विभाग, लघु पाटबंधारे विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, सहायक निबंधक (सहकारी संस्था) कार्यालय, तलाठी कार्यालय, मंडलाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, धोम पाटबंधारेसह इतर जलसंपदा विभागातील कार्यालये व पंचायत समिती आवारात सध्या तीव्र पाणी टंचाई भासत आहे.
या कार्यालयांमध्ये सर्वसामान्य लोकांना पिण्यास पाणी देण्याची व्यवस्था नसल्याने फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. (प्रतिनिधी)
कोरेगाव ग्रामपंचायतीत देखील पाणी नाही
तालुका मुख्यालयाची ग्रामपंचायत असलेल्या कोरेगाव ग्रामपंचायत कार्यालयात गेल्या चार दिवसांपासून पिण्यासाठी पाणी उपलब्ध नव्हते. यासंदर्भात चौकशी केली असता, तांत्रिक कारण देण्यात आले. एकंदरीत कोरेगाव शहरासाठी पाण्याची व्यवस्था करणाऱ्या ग्रामपंचायतीसह पंचायत समिती व इतर कार्यालयात पाणी उपलब्ध नसल्याने लोकांचे हाल होत आहेत. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.