सरकारला सामान्यांची काळजी नाही
By Admin | Updated: November 18, 2015 00:09 IST2015-11-17T21:40:50+5:302015-11-18T00:09:25+5:30
पृथ्वीराज चव्हाण : खोडशी येथे ज्योर्तिलिंग मंदिराच्या सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी आरोप

सरकारला सामान्यांची काळजी नाही
कऱ्हाड : ‘सध्याच्या सरकारने निर्बंध उठवताच डाळींचे दर महागले. यामुळे व्यापाऱ्यांना चांगलाच याचा फायदा झाला. हे लक्षात आल्यानंतर सरकारने धान्याच्या साठ्यांवर छापे टाकले. त्यानंतर व्यापारी न्यायालयात गेले. परंतु हा खेळ करत असताना सर्वसामान्यांचे जीवन असाह्य झाल्याने त्यांची काळजी या सरकारला पडलेली नाही,’ असा आरोप माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.खोडशी, ता. कऱ्हाड येथे आमदार फंडातून सुमारे २७ लाख रुपये निधीतून बांधण्यात आलेल्या ज्योर्तिलिंग मंदिराच्या सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी अध्यक्षस्थानी आमदार आनंदराव पाटील होते. नीळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज, माई ट्रस्टच्या अध्यक्षा संगीता साळुंखे, किसनराव पाटील-घोणशीकर, सांगलीचे सचिदानंद कदम, मलकापूर उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजित चव्हाण, कऱ्हाड बाजार समितीचे संचालक सुनील पाटील, जखिणवाडीचे माजी सरपंच अॅड. नरेंद्र पाटील, अश्विनी लवटे, खोडशी सरपंच मनीषा तांबे, उपसरपंच सचिन भोसले, नामदेव पाटील, रमेश लवटे, डॉ. सतीश थोरवडे, बाळासाहेब पवार, कृष्णत पवार आदी उपस्थित होते.
आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘खोडशीच्या ज्योर्तिलिंग मंदिराच्या कामामध्ये शासन निधीबरोबर माहेरवाशिणी व दानशूरांनी मदत केल्याने हे काम पूर्णत्वास गेले आहे.
सरकार शेतकऱ्यांबाबत गंभीर नसल्याने अर्थकारण कोलमडले आहे. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या उसाचा दर ठरवण्याची जबाबदारी सरकारने पाळलेली नाही. दुसरीकडे डाळीचे दर वाढले आहे. त्याचबरोबर या वर्षी पाणी व चाऱ्याचे संकट आपल्यासमोर आहे. याबाबत सरकार गंभीर नाही.’ असा आरोप आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
आमदार आनंदराव पाटील म्हणाले, ‘पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचंड जनसंपर्काचा विरोधकांमध्ये पोटशूळ निर्माण झाला आहे. त्यांनी मुख्यमंत्री असताना गट-तट न पाहता प्रत्येक गावात विकास पोहचवला.’
यावेळी मनोहर शिंदे, संगीता साळुंखे, सचिदानंद कदम, हंबीरराव भोसले, संभाजीराव भोसले यांनी मनोगते व्यक्त केली.
राजेंद्र पाटील व सुरेश भोसले यांनी स्वागत केले. विजय माने यांनी प्रास्ताविक केले. युवराज पवार यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)