शासकीय झाले खासगी; शिक्षकांच्या लसीची म्हणे माहितीच उपलब्ध नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:23 IST2021-09-02T05:23:06+5:302021-09-02T05:23:06+5:30
स्टार : ११०८ लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करून घेण्यात ...

शासकीय झाले खासगी; शिक्षकांच्या लसीची म्हणे माहितीच उपलब्ध नाही!
स्टार : ११०८
लोकमत न्यूज नेटवर्क,
सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करून घेण्यात आल्याची माहिती शिक्षण विभाग देत आहे. तर खासगी शिक्षक अद्यापही लसीच्या प्रतीक्षेत आहेत. किती जण लसीपासून वंचित आहेत आणि किती जणांना लस दिली, याची अद्यावत माहिती शिक्षण विभागाकडे नसल्याने जिल्ह्यातील खासगी शिक्षकांचे लसीकरण नेमके किती झालंय याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
शासकीय तसेच खासगी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण ५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करून घेण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर लसीकरण करून घेण्याचे आवाहन शिक्षकांना करण्यात आले आहे; मात्र किती झाले आणि कोण राहिले, याची संकलीत माहिती नसल्याने शासनाने निर्धारित केलेल्या तारखेपर्यंत शिक्षकांचे लसीकरण होईल, याबाबत साशंकता आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने माध्यमिक शाळांपाठोपाठ आता प्राथमिक शाळांतील इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग प्रत्यक्षात सुरू करण्याचा विचार राज्य शासन करत आहे. त्याबाबत सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाने तालुका पातळीवर गटशिक्षण अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. गर्भवती शिक्षिका, महिला कर्मचारी, कोरोना पॉझिटिव्ह, आजारी शिक्षक यांसह नोंदणी न केल्याने एकही डोस घेतलेला नाही, असे शिक्षकही जिल्ह्यात आहेत.
पॉईंटर
आतापर्यंत झालेले लसीकरण
दोन्ही डोस घेतलेले
शासकीय शाळांतील शिक्षक : १४५८९
शासकीय शिक्षकेत्तर कर्मचारी : १९
खासगी शाळांतील शिक्षक : विभागाकडे माहिती नाही
खासगी शाळांतील शिक्षकेतर कर्मचारी : विभागाकडे माहिती नाही
शासकीय शाळांतील शिक्षक : १४५८९
शिक्षकेतर कर्मचारी : १९
खासगी शाळांतील शिक्षक : १९७५८
शिक्षकेतर कर्मचारी : २३६७
... म्हणून नाही घेतली लस
दोन डोस घेतल्यानंतरही मी कोरोना पॉझिटिव्ह झालो होतो. त्यामुळे तेव्हा लस घेता आली नव्हती. कोरोना झाल्यानंतर तीन महिन्यांनी डोस घेणे अपेक्षित आहे. त्यानुसार मी लस घेणार आहे.
- सचिन शेळके, कोरेगाव.
गर्भवती असल्याने मी लस घेतली नव्हती. बाळ सहा महिन्यांचे झाल्यानंतर लस घ्या, असा वैद्यकीय सल्ला मिळाल्याने मी अद्यापही लस घेतली नाही. शाळेत रूजू होण्यापूर्वी मी डोस घेणार आहे.
- अस्मिता वाईकर, फलटण
चौकट :
खासगी शिक्षकांकडे विभागाचे लक्ष
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे फ्रंटलाइन वर्कर म्हणून गतवर्षीच लसीकरण करून घेण्यात आले. त्यावेळी अगदी महिन्याच्या अंतराने दोन्ही डोस घेण्यात आले. वैद्यकीय कारणांनी ज्या शिक्षकांना लस घेता आली नाही त्यांनीही मागील सप्टेंबरमध्ये शाळा सुरू होणार म्हणून लस घेतली आहे. खासगी शाळांतीलही बहुतांश विद्यार्थ्यांनी लस घेतली आहे; पण किती जण यातून शिल्लक राहिलेत, याची नोंदच शिक्षण विभागाकडे नाही.
प्रतिक्रिया
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या शिक्षकांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्थांकडे कार्यरत असलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या लसीकरणासाठी आम्ही पाठपुरावा करत आहे. ५ सप्टेंबरपर्यंत सगळ्यांचे लसीकरण व्हावे, याच्या सूचना गटशिक्षणाधिकाऱ्यांना केली आहे.
- प्रभावती कोळेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी.
............