पश्चिमेकडे चांगला पाऊस; पूर्वेकडेही पिकांना दिलासा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:46 IST2021-09-07T04:46:28+5:302021-09-07T04:46:28+5:30
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात १५ दिवसानंतर चांगला पाऊस झाला. नवजा येथे सर्वाधिक ४४ तर कोयेनला २२ मिलिमीटर पावसाची ...

पश्चिमेकडे चांगला पाऊस; पूर्वेकडेही पिकांना दिलासा !
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात १५ दिवसानंतर चांगला पाऊस झाला. नवजा येथे सर्वाधिक ४४ तर कोयेनला २२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक होत असून, साठा ९५ टीएमसीजवळ पोहोचला आहे. तर पूर्व दुष्काळी भागातही दमदार पाऊस होत आहे. यामुळे खरीप पिकांना दिलासा मिळालाय.
जिल्ह्यात जुलै महिन्याच्या मध्यावर जोरदार पाऊस झाला होता. पश्चिम भागात तर धुवाँधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. रस्ते वाहून गेले होते, जमिनी तुटल्या होत्या. लोकांवर काळ बनून पाऊस आला होता. तर अवघ्या तीन दिवसात कोयना, नवजा आणि महाबळेश्वरला विक्रमी पाऊस झाला होता. त्याचबरोबर कोयना धरणात प्रथमच मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली होती. २४ तासांत १६ टीएमसीने पाणीसाठा वाढला होता. तसेच इतर धरणांमध्येही पाणी वेगाने वाढले. मात्र, ऑगस्ट महिन्यात एकदम कमी प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे धरणे पूर्णपणे भरलीच नाहीत तर पूर्वेकडील खरीप हंगामातील पिके पावसाअभावी वाळू लागली होती. त्यामुळे धरणे भरणार का? अशी चिंता लागली होती. तसेच खरीप हंगाम वाया तर जाणार नाही ना? अशी भीतीही व्यक्त होत होती. परंतु, गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. अनेक ठिकाणी दमदार पाऊस होत आहे.
पूर्व भागातील माण, खटाव, फलटण तालुक्यांत काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. यामुळे खरीप हंगामातील पिकांना फायदा झाला तसेच काही ठिकाणी पिकांचे नुकसानही झाल्याची माहिती पुढे येत आहे. पश्चिम भागात तर चांगलाच पाऊस होत आहे. यामुळे प्रमुख धरणांमधील पाणीसाठा वाढत चालला आहे. असाच पाऊस आणखी काही दिवस राहिल्यास उशिरा का असेना धरणे भरतील, अशी आशा आहे.
चौकट :
महाबळेश्वरला १८ मिलिमीटर पाऊस...
सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना येथे २२ मिलिमीटर पाऊस पडला तर जूनपासून आतापर्यंत ३,६४७ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तसेच नवजा येथे ४४ आणि आतापर्यंत ४,८५४ व महाबळेश्वरला १८ तर यावर्षी आतापर्यंत ४,९६८ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. कोयना धरणात सकाळच्या सुमारास ९४.५१ टीएमसी पाणीसाठा झाला होता तर २४ तासांत ६,१७३ क्युसेक वेगाने पाणी येत होते. धरणाच्या पायथा वीजगृह आणि दरवाजातील पाणी विसर्ग बंदच आहे.
..................................................................