‘शुभमंगल’वर महागाईचे ‘अशुभ’ सावट
By Admin | Updated: April 15, 2015 23:58 IST2015-04-15T21:46:02+5:302015-04-15T23:58:09+5:30
दरवाढीचा निर्णय : मंगल कार्यालय व्यवसाय होणार अधिक खर्चिक

‘शुभमंगल’वर महागाईचे ‘अशुभ’ सावट
सातारा : वाढता वाढता वाढे, अशी अवस्था महागाईची झाल्यामुळे आता सर्वच ठिकाणी त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. त्याला अपवाद मंगलकार्य व्यावसायिकही नाहीत. गेल्या काही दिवसांत बाजारात असलेली आर्थिक तेजीचा फटका या व्यावसायिकांनीही बसला आहे. त्यामुळे या हंगामात त्यांनी दरवाढ करण्याचा प्रस्ताव पारीत केला आहे. त्यानुसार प्रत्येकाने दहा टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.सातारा शुभमंगल कार्य व्यावसायिक विकास संस्था यांची वार्षिक सभा नुकतीच पार पडली. यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी, सभासद, तसेच मंगल कार्यालयाचे मालक, आचारी व मंडप व्यावसायिक उपस्थित होते. यावेळी सभासदांनी व्यावसायिक क्षेत्रात निर्माण होणाऱ्या समस्या, ग्राहकांना देण्यात येणारी सेवा, तसेच दरवाढ आदी विषयांवर चर्चा करून सध्याच्या महागाईच्या काळात ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याच्या दृष्टीने विविध उपाय सुचविले व सध्या अस्तित्वात असणाऱ्या दरात वाढ करणे आवश्यक असल्याचे मत मांडले.गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्यामुळे मंगल कार्य व्यावसायिकांनाही अनिवार्यपणे दरवाढ करावी लागत आहे. गेल्या तीन वर्षांत कोणतीही दरवाढ झाली नसल्यामुळे यावेळी त्यांनी सरसकट दहा टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.दरवाढीच्या विषयावर सर्व सभासदांनी एकमत झाल्यावर दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. तसेच दरवाढीचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
जिल्ह्यातील सर्व व्यावसायिकांनी दर पत्रकाप्रमाणे दर घ्यावेत व अंमलबजावणी करावी, असेही या बैठकीत ठरविण्यात आले. संस्थेच्या सर्व सभासदांनी तसेच व्यावसायिकांनी संस्थेने काढलेले नवीन वाढीव दर पत्रक घेऊन जावे, असे आवाहनही करण्यात आले. (प्रतिनिधी)
अशी झाली दरवाढ
खुर्ची ५१०
ताट (शेकडा)१५०२००
आचारी७००१५००
सहायक१००३५०
व्यावसायिक
सिलिंडर६००१२००
मंडप ५७
(प्रति स्क्वे. फू.)
मदतनिसांचा तुटवडा..
मंगल कार्य व्यावसायिकांना सध्या कुशल कामगारांचा तुटवडा जाणवत आहे. पूर्वी शंभर रुपये हजेरी या दराने येणारे युवक आता तीनशे रुपये आकारू लागले आहेत. जेवण वाढणे एवढ्या एका कामासाठी एका मुलाला तीनशे द्यावे लागतात. अशी किमान दहा मुले घ्यावी लागतात. अलीकडे मात्र तीनशे रुपये देऊनही मुलं मिळत नाहीत. त्यामुळे व्यावसायिकांनी आपल्या नात्यातील लोकांना सोबत घेऊन हे काम करावे लागत आहे.
गेल्या काही दिवसांपासून बाजारातील परिस्थिती आणि वस्तूंचे दर लक्षात घेता शुभमंगल कार्य व्यावसायिकांना जेमतेम उत्पन्न मिळत आहे. लग्नसराईत जर उत्पन्न नाही मिळाले तर पुढे वर्षभर या व्यावसायिकांना हालाखीत काढावे लागते. त्यामुळे या दरवाढीला ग्राहकांनीही सकारात्मक प्रतिसाद द्यावा.
- उदय गुजर, अध्यक्ष शुभमंगल
लग्न कार्यात निर्धारित केलेल्या खर्चापेक्षा अधिकचा खर्च होतो. त्यात आता मंगल कार्यालय व्यावसायिकांनी केलेली दरवाढ त्रासाची ठरणार आहे. आता या वाढीव खर्चासाठीही लग्नाच्या बजेटमध्ये तरतूद करावी लागणार हे स्पष्ट आहे.
- सयाजी कदम, सातारा