गोंदवलेतील वाटांवरून, श्रींची सवारी पाटांवरून!
By Admin | Updated: December 10, 2014 23:58 IST2014-12-10T21:38:47+5:302014-12-10T23:58:16+5:30
रामनामाचा जयघोष : ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पादुकांची ग्रामप्रदक्षिणा

गोंदवलेतील वाटांवरून, श्रींची सवारी पाटांवरून!
गोंदवले : श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या १०१ व्या पुण्यतिथी महोत्सवास रविवारपासून सुरुवात झाली असून, या निमित्ताने श्रींच्या पादुकांचा पालखी सोहळा ग्रामप्रदक्षिणेसाठी रवाना झाला. पालखी वाहणाऱ्यांचे पाय जमिनीला टेकू द्यायचे नाहीत, हा नियम असल्याने पायाखाली पाट ठेवण्याची प्रथा गोंदवलेनगरीने आजून जपली आहे.
गोंदवले येथील पालखीच्या ग्रामप्रदक्षिणेत पाटांची प्रथा कसोशीने पाळली जाते. पालखीला पुढे आणि मागे असे दोन पालखीधारक असतात. त्यांचे पाय जमिनीवर पडू दिले जात नाहीत. पूर्वीच्या काळी येथील रस्ते ओबडधोबड होते. रस्त्यावर दगड होते. त्यामुळे पालखी उचलणाऱ्यांचे पाय जमिनीवर पडू दिले जात नाहीत. त्याऐवजी त्यांच्या पायाखाली लाकडी पाट अंथरले जातात. पालखी जसजशी पुढे जाईल, तसतसे मागचे पाट उचलून पुढे आणले जातात. त्यासाठी पन्नास ते साठ युवकांचा गट कार्यरत असतो. पाट मागून पुढे आणण्यासाठी युवकांची साखळी तयार केली जाते.
हा पालखी सोहळा सलग दहा दिवस चालणार असून, गावातल्या प्रत्येक मंदिरात भाविक दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. एकादशीला या सोहळ्याची सांगता होणार आहे. पुण्यतिथी महोत्सवाची सुरुवात कोठीपूजनाने झाली होती. मंगळवारी सकाळी समाधी परिसरात महाराजांच्या पादुकांचे विधीवत पूजन करण्यात आले. आरतीनंतर भाविकांनी ‘श्रीराम जयराम जयजयराम’चा जयघोष मोठ्या उत्साहात केला. त्यानंतर या पादुका सजविलेल्या पालखीत विराजमान करण्यात आल्या. मंदिर प्रदक्षिणेनंतर पालखी ग्रामप्रदक्षिणेसाठी निघाली. अग्रभागी बताशा अश्व आणि पताकाधारी भाविक तल्लीन होऊन रामनामाचा जयघोष करीत होते. पालखीमार्गावर महिलांनी सडा-रांगोळ्या घातल्या होत्या. जागोजागी पालखीचे औक्षण करण्यात आले. (प्रतिनिधी)
पालखी उचलणाऱ्यांच्या पायाखाली ठेवले जाणारे पाट ग्रामस्थांनी स्वखुशीने दान केलेले आहेत. असे सुमारे पन्नास पाट ग्रामप्रदक्षिणेसाठी वापरले जातात. गेल्या चाळीस वर्षांपासून ही प्रथा सुरू असून, गेली तीस वर्षे या प्रथेचे नियोजन मी पाहतो. गावातील युवक दहा दिवस स्वयंप्रेरणेने पाट उचलण्याचे आणि अंथरण्याचे काम करतात.
- सुरेश काटकर,
सामाजिक कार्यकर्ते
ग्रामपंचायतीतर्फे स्वागत
बाजार पटांगणावर श्रीराम मंदिरात पालखी आल्यावर आरती झाली. या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीने पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले. समाधी मंदिरात स्नेहश्री संगीत मंडळाच्या गायनाचा कार्यक्रम झाला. नीलिमा रणभोर, नलिनी आपटे यांची भक्तिगीते, रमेश रावतकर यांचे भक्तिसंगीत असा कार्यक्रम झाला. पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त समाधीचे दर्शन घेण्यासाठी दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत असून, वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी दहीवडीचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांनी नियोजन केले आहे.