शेणखताला आलाय सोन्याचा भाव
By Admin | Updated: March 16, 2015 00:16 IST2015-03-15T22:20:35+5:302015-03-16T00:16:41+5:30
परळी खोरे : सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांचा कल; एक हजाराला एक ट्रॉली खत

शेणखताला आलाय सोन्याचा भाव
परळी : परळी खोऱ्यात गेल्या चार-पाच वर्षांपासून शेतकरी वर्गाकडून रासायनिक खताचा अमर्याद वापर झाला होता. रासायनिक खताच्या अमार्याद वापरामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ न होता उलट जमिनीचा पोत खालावून शेतीक्षेत्र क्षारपड बनले जात होते. हे शेतकऱ्यांनी लक्षात घेऊन गेल्या चार-पाच वर्षांपासून शेतकरी वर्गाने कसदार जमिनीचा पोत ढासळू नये यासाठी सेंद्रिय शेती पिकविण्यावर भर दिला आहे.रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे परळी भागातील शेणखताला सोन्याचा भाव आला आहे. एका ट्रॉलीच्या शेणखताचा दर हा एक हजार रुपये इतका असून, या ट्रॉलीमध्ये सर्वसाधारण तीन बैलगाड्या शेणखत बसते. त्यामुळे गाडीचा एक हजार रुपये इतका दर झाल्याने शेतकरीवर्ग धायकुतीस आला आहे. गेल्या दोन वर्षांपासूनच या खताचे दर हे गगनाला भिडले आहेत.पाच वर्षांपूर्वी ३००-४०० रुपये बैलगाडी इतका दर असणारा सध्या हजारावर पोहोचल्याने परिसरातील परळी, ठोसेघर, बनघर आदी गावांमधील शेतकरऱ्यांना शेती पिकविणे अडचणीचे ठरू लागले आहे. रासायनिक खताचे दर परवडणारे नसल्याने व रासायनिक खतापासून मिळणाऱ्या लिंक जोड खताची बचत होत नसल्याने गेल्या दोन वर्षांपासून परळीसह परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत शेतखताच्या वापरावर अधिक भर दिला आहे. (वार्ताहर)
सबसिडीवरील खतांचाही घेतला लाभ
परळी, ठोसेघर परिसरातील शेतकऱ्यांनी कधी नव्हे तर यंदा कृषी खात्याकडे उपलब्ध होणाऱ्या सबसिडीवरील सर्वप्रकारच्या खतांचाही सार्वधिक लाभ घेतला आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा जवळजवळ ५० टक्के शेतकऱ्यांनी कृषी खात्याकडून मिळणाऱ्या खताचा व विविध योजनांचा लाभ मिळवून घेतला आहे. रासायनिक खतांचे वाढलेले दर लक्षात घेऊन शेतकरीवर्गाने कृषी खात्याकडून मिळणाऱ्या खताला सर्वाधिक पसंती दिली आहे.