सुशोभीकरणाला कोंदण अतिक्रमणाचे गोडोली
By Admin | Updated: December 30, 2014 23:28 IST2014-12-30T21:57:17+5:302014-12-30T23:28:55+5:30
तळे : झोपड्यांचा महिन्यांपासून तळ

सुशोभीकरणाला कोंदण अतिक्रमणाचे गोडोली
सातारा : लाखो रूपये खर्च करून गोडोली तळ्याचे सुशोभिकरण झाले. पण या सुशोभिकरणाला अतिक्रममणाचे कोंदण लागले आहे. तळ्याच्या शेजारीच काही झोपड्या उभ्या राहिल्या आहेत. यात राहणाऱ्यांचा अवघा संसार तळ्याच्या संरक्षक भिंतीवर लोंबकळताना दिसत आहे. गोडोली तळे हे या परिसरातील नागरिकांच्या अस्मितेचा विषय. म्हणूनच या तळ्याच्या दगडांना प्रत्येक गोडोलीकराचा स्पर्श झाला आहे. अथक कष्ट आणि कायदेशीर संग्राम सर करून काही महिन्यांपूर्वी तळ्याचे काम पूर्ण झाले. पावसाळ्यात तळे भरल्याने येणाऱ्या जाणाऱ्या अनेकांना तळ्याचा परिसर खुणावु लागला. कोणी वॉकिंग ट्रॅक म्हणून तर कोणी संध्याकाळी विसावा घेण्याचे ठिकाण म्हणून या परिसरात दिसतात. काही महिन्यांपूर्वी गोडोली तळ्या समोरील जागेची विक्री करण्यात आली. त्यावेळी या जागेवर असणारी झोपडपट्टी काढण्यात आली. त्यामुळे सुमारे ६ ते ७ कुटूंबे उघड्यावर पडली. स्वत:ची तात्पुरती व्यवस्था करण्यासाठी म्हणून या लोकांनी तळ्याचा आसरा घेतला. काही दिवसांत यांची व्यवस्था होईल आणि हे जातील असा कयास गोडोलीकर बांधत होते. मात्र महिन्याहून अधिक काळ लोटला तरीही हालण्याची तयार न दाखवणाऱ्या या नागरिकांविषयी आता संतापाची लाट वाढू लागली आहे. ज्या तळ्याचे रेलिंग एकेकाळी संरक्षण जाळी म्हणून वापरले जात होते, त्या रेलिंगवर आता कपडे वाळत घातलेली दिसतात. ज्या पाण्यात निरभ्र आकाश दिसते त्याच पाण्यात आंघोळ, कपडे आणि भांडी घासणाऱ्या महिला बघून नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. परिसरात काही नागरिक आणि स्थानिक नेत्यांच्या पुढाकाराने यातील काही चिमुकल्यांना शाळेत प्रवेशही घेण्यात आला आहे. येथे राहणाऱ्या एक दोन जणांना मजुरीची कामेही देण्यात आली आहेत. रस्त्याच्या अगदी शेजारीच या झोपड्या आहेत. या रस्त्यावरून रात्रीच्यावेळी भरधाव वेगाने जाणारी वाहने आहेत. झोपड्या वळणावरच असल्याने वाहनावरील ताबा सुटून अपघात होण्याची शक्यताही दाट आहे. अशावेळी या लोकांचा जीव धोक्यात येवू शकतो. पोलिस चौकीच्या बाहेरच असणाऱ्या या झोपड्या तातडीने काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे. (प्रतिनिधी) गेल्या दहा बारा वर्षांपासून हे लोक येथे राहतात. तात्पुरत्या स्वरूपात त्यांना तळ्याच्या शेजारी राहण्याची परवानगी दिली आहे. लवकरचं त्यांना अन्यत्र जागा उपलब्ध करून देण्याचा विचार करत आहे. - अॅड. दत्तात्रय बनकर, पक्षप्रतोद सातारा विकास आघाडी सगळचं उघड्यावर...! काही महिन्यांपूर्वी गोडोली तळ्या समोर राहणाऱ्या या नागरिकांना जागा मालकाने हाकलून लावले. तेव्हापासून रस्त्याच्या खाली असलेली ही मंडळी रस्त्याच्या अगदी शेजारी आली आहेत. सुसाट वेगाने जाणाऱ्या गाड्यांचा कर्णकर्कश आवाज ऐकत रात्रीच्यावेळी त्यांना जिव मुठीत घेवून रहावे लागते.