माणची चळवळ दिशा देणारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:45 IST2021-08-17T04:45:00+5:302021-08-17T04:45:00+5:30
दहिवडी : माण तालुक्यात लोकसहभागाची चळवळ मोठ्या प्रमाणात उभी राहिली. ही चळवळ राज्याला दिशा देणारी आहे,’ असे गौरवोद्गार जिल्हा ...

माणची चळवळ दिशा देणारी
दहिवडी : माण तालुक्यात लोकसहभागाची चळवळ मोठ्या प्रमाणात उभी राहिली. ही चळवळ राज्याला दिशा देणारी आहे,’ असे गौरवोद्गार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी काढले.
दहिवडी येथील प्रांत कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित माण खटाव वसुधराव समृद्ध गाव योजनेत निवड झालेल्या २९ गावे व जलदूताच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी आमदार जयकुमार गोरे, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, प्रांताधिकारी कासार, डॉ. माधवराव पोळ, नगराध्यक्ष धनाजी जाधव, पाणी फाऊंडेशनचे ननावरे, आबा लाड, आजित पवार, बलवंत पाटील, नंदकुमार खोत, सुनील पोळ, सिद्धार्थ गुंडगे, संदीप खाडे उपस्थित होते.
गौडा म्हणाले, ‘माण तालुक्याच्या मातीत श्रमदानाची चळवळ रुजली आहे. येथील प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी यांच्या एकजुटीमुळे तालुक्यातील गावांनी वॉटरकप स्पर्धेत बक्षीस फटकाविले. समृद्ध गाव स्पर्धेतही ही गावे चमकतील.’
आमदार गोरे म्हणाले, ‘माणमध्ये बाहेरून पाणी आले. मोठ्या प्रमाणात पाणी आडवले पण आपण पाटाने पाणी देतो हे खूप वेदनादायी आहे. यापुढे पाण्याचे नियोजन होणे गरजेचे आहे. तरच याचा उपयोग आहे. सर्व राजकारण्यांना एकत्र आणण्याचे काम या चळवळीने केले. यापुढे ही या चळवळीला राजकीय वास येऊ देऊ नका.’
प्रभाकर देशमुख म्हणाले, ‘माण तालुक्यातील अनेक गावांनी या योजनेत सहभाग घेतला. आजही समृद्ध गाव योजनेत सर्वांत जास्त गावे तालुक्यातील आहेत. वॉटरकप स्पर्धेत समृद्ध गाव योजनेचा पहिला टप्पा २९ गावांनी पूर्ण केला. यापुढील प्रवास खडतर आहे. त्यामुळे सर्वांनी गाव पातळीवर नियोजन करावे, प्रत्येक कुटुंब समृद्ध व्हावे यासाठी प्रयत्न व्हावा.’
फोटो
दहिवडी येथे समृद्ध गाव स्पर्धेच्या पहिला टप्पा पूर्ण केलेल्या गावांना विनय गौडा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार जयकुमार गोरे, प्रभाकर देशमुख, प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी उपस्थित होते. (छाया : नवनाथ जगदाळे)