दगडफेक करणाऱ्या तरुणांना पोलीस संरक्षण द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:41 IST2021-05-08T04:41:41+5:302021-05-08T04:41:41+5:30
सातारा : ‘राजकीय पक्षांच्या कार्यालयावर दगडफेक करणाऱ्या तरुणांना आमदार शशिकांत शिंदे यांनी धमकी दिली आहे. पोलिसांनी संबंधित तरुणांची तक्रार ...

दगडफेक करणाऱ्या तरुणांना पोलीस संरक्षण द्या
सातारा : ‘राजकीय पक्षांच्या कार्यालयावर दगडफेक करणाऱ्या तरुणांना आमदार शशिकांत शिंदे यांनी धमकी दिली आहे. पोलिसांनी संबंधित तरुणांची तक्रार नोंदवून घ्यावी, तसेच त्यांना त्यांचा जीव धोक्यात असल्याने त्यांना पोलिस संरक्षण द्यावे,’ अशी मागणी माथाडी नेते माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
नरेंद्र पाटील म्हणाले, ‘मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही, म्हणून या समाजातील तरुण संतप्त झाले आहेत. ते कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते आहेत, याचा शोध लावत बसण्यापेक्षा आरक्षण देण्यात आपण कमी पडलो, हे सरकारने मान्य करावे. आमदार शशिकांत शिंदे यांनी या दगडफेक करणाऱ्या तरुणांच्या घरी जाऊन यांना धमकी दिली आहे. जेव्हा युतीचे सरकार सत्तेत होते, तेव्हा मराठा मोर्चाच्या वेळी महामार्गाच्या पुलाखाली दगड कुणी आणून ठेवले. कुठल्या आमदारांच्या सांगण्यावरून हे कृत्य केले गेले होते, हे सर्वांना माहीत आहे. आता आमदार शिंदे यांच्या भूमिकेत बदल झाला आहे.’
मराठा आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपली भूमिका बदलली आहे. आता न्यायालयाने आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर केंद्र सरकारने निर्णय घ्यावा, असे मुख्यमंत्री सांगताहेत वास्तविक हा निर्णय हा राज्यपातळीवर घ्यायला पाहिजे, केंद्राचे याचा काही संबंध नाही. आरक्षण मिळाले नसल्याने मराठा समाजातील तरुणांच्या भावना तीव्र झालेले आहेत. ही मुले मराठा आहेत, म्हणून तर त्यांनी रागातून दगडफेक केली. हे कुठल्या एका पक्षाचे कार्यकर्ते आहेत, असे आमदार शिंदे म्हणाले आहेत. या मुलांना धमकावले गेले आहे, त्यामुळे त्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांच्या पाठीशी ठाम उभे आहोत. समाजाला आरक्षण देण्यात आणखी वेळ गेला, तर मोठा उद्रेक होईल, असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.